अकोल्यातून जाणाऱ्या तीन रेल्वे गाड्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:18 AM2020-12-24T04:18:04+5:302020-12-24T04:18:04+5:30
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दौंड-मनमाडदरम्यान श्रीगोंदा ते बेलवंडी स्थानकांदरम्यान अहमदनगरजवळ मालगाडीचे १२ डब्बे घसरल्यामुळे पुढील ...
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दौंड-मनमाडदरम्यान श्रीगोंदा ते बेलवंडी स्थानकांदरम्यान अहमदनगरजवळ मालगाडीचे १२ डब्बे घसरल्यामुळे पुढील लांब पल्ल्याच्या चार रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही गाड्या वळविण्यात आल्या आहेत. बुधवारी रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये ०२११७ पुणे-अमरावती स्पेशल ट्रेन, ०१०३९ कोल्हापूर-गोंदिया या दोन रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. तसेच २५ डिसेंबर रोजी धावणारी ०१०४० गोंदिया-कोल्हापूर ही रेल्वे गाडीदेखील रद्द करण्यात आली.
या गाड्यांचा मार्ग वळविला
०१०३९ कोल्हापूर - गोंदिया ही गाडी मंगळवारी कोल्हापूर रेल्वेस्थानकावरून निघाली होती. अपघातामुळे या गाडीचा मार्ग पुणे-लोणावळा-पनवेल-इगतपुरी-मनमाडमार्गे वळविण्यात आला. तसेच सोमवारी (दि. २१) गोंदिया येथून निघालेली ०१०४० गोंदिया- कोल्हापूर रेल्वेगाडी, मंगळवारी अजनी येथून निघालेली ०२२२४ अजनी-पुणे आणि बुधवारी निघालेली ०१०४० गोंदिया-कोल्हापूर रेल्वेगाडीचा मार्ग मनमाड-इगतपुरी-पनवेल-लोणावळा-पुणेमार्गे असा वळविण्यात आला.