पत्नीचा छळ करणाऱ्या पतीस तीन वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 01:25 PM2018-12-07T13:25:43+5:302018-12-07T13:25:50+5:30
अकोला: बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काटेपूर्णा येथील रहिवासी पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने आरोपी पतीस तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा गुरुवारी सुनावली.
अकोला: बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काटेपूर्णा येथील रहिवासी पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने आरोपी पतीस तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा गुरुवारी सुनावली. यासोबतच ४० हजार रुपयांचा दंडही आरोपीस ठोठावला असून, या प्रकरणातील पाच आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
काटेपूर्णा येथील रहिवासी अर्चना सहदेव बावने यांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळीकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत असल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीवरून बोरगाव मंजू पोलिसांनी तिचा पती सहदेव गोविंदराव बावने याच्यासह सहा जणांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४९८ नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केल्यानंतर आठवे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने आरोपी पती सहदेव गोविंदराव बावने याला दोषी ठरवीत भारतीय दंड विधानाच्या कलम ४९८ अन्वये तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली, तर कलम ३२३ अन्वये ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच ४० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.