अकोल्यात तीन वर्षाच्या चिमुकल्याची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 11:50 AM2020-05-07T11:50:05+5:302020-05-07T11:50:48+5:30
एक महिना कोरोनाशी चिवट झुंज देऊन, त्याने बुधवारी विजयी मुद्रेने रुग्णालयाबाहेर पाऊल ठेवले.
अकोला : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जडलेल्या कोवीड-१९ आजाराशी तब्बल महिनाभर झुंज दिल्यानंतर अकोला येथील एका तीन वर्षीय बालकाने अखेर या जीवघेण्या आजाराला मात दिली आहे. तब्बल एक महिना कोरोनाशी चिवट झुंज देऊन, त्याने बुधवारी विजयी मुद्रेने रुग्णालयाबाहेर पाऊल ठेवले. यावेळी सर्व डॉक्टर्स आणि उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याला टाळ्या वाजवित निरोप दिला.
कोरोना म्हणजे काय? हे ही कदाचित त्या बालकाला माहिती नसावे. त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या संपकार्तून त्यालाही कोरोनाची लागण झाली. संपर्काच्या चाचण्या प्रशासनाने घेतल्या तेव्हा त्यात हा दि. ७ एप्रिल रोजी आलेल्या अहवालात पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले. साहजिकच लहान असल्याने त्याची झुंज मोठ्या विषाणूशी होती. आज तब्बल एक महिन्याने त्याला या झुंजीत विजय मिळाला.
या दरम्यान त्याची तब्येत पॉझिटीव्ह आणि निगेटीव्ह अहवालांच्या दोन टोकांमध्ये हेलकावे खात होती. या दरम्यान या बालकाच्या एक नव्हे दोन नव्हे तब्बल आठ चाचण्या झाल्या. त्यातल्या पहिल्या चार तर पॉझिटीव्ह आल्या. पाचवी चाचणी निगेटीव्ह आली. पुन्हा आशा उंचावली. मात्र पाच दिवसांनी घेतलेली सहावी चाचणी पुन्हा पॉझिटीव्ह आली. २४ तासांनंतर सातवी चाचणी पुन्हा निगेटीव्ह आली. त्यानंतर पुन्हा पाच दिवसांनी दि.२ मे रोजी झालेली चाचणी निगेटीव्ह आली.
त्यानंतरही त्याच्या एक्स रे सहित विविध चाचण्या घेऊन चार दिवस त्याला पुन्हा डॉक्टरांनी निरीक्षणाखाली ठेवले. सर्व तपासण्या आणि चाचण्यांचे अहवाल समाधानकारक आल्यानंतरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोवीड उपचार पथकाने आज या बालकाला पूर्ण बरा झाल्यानंतर निरोप दिला. आता हा बालक १४ दिवस घरातच क्वारंटाईन करुन राहिल. त्याने ज्या चिवटपणे कोरोना विरुद्ध झुंज दिली. त्याची जिद्द वाखाणण्यासारखीच आहे. डॉक्टरांनीही जिद्दीने उपचारांची शर्थ केली. आणि त्याला कोरोनाच्या जबड्यातून बाहेर काढलंच. इथच कोरोना हरला!
या लहानग्या रूग्णाला निरोप देण्यासाठी अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे,उप अधिष्ठाता डॉ.अनिलकुमार बत्रा, डॉ.अपुर्व फावडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शामकुमार सिरसाम, डॉ,अपर्णा वाहाने , वैद्यकीय उप अधीक्षक डॉ.दिनेश नैताम व इतर सर्व वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.