तीन वर्षांपूर्वी चोरीला गेलेली कार जप्त
By admin | Published: March 12, 2017 02:24 AM2017-03-12T02:24:34+5:302017-03-12T02:24:34+5:30
वर्धा जिल्हय़ातील दोन चोरट्यांनाही पोलिसांनी अटक केली.
अकोला, दि. ११- सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वृंदावन नगर येथून ३ वर्षांपूर्वी चोरीस गेलेली कार जप्त करण्यात पोलिसांना यश आले. या कार चोरीतील वर्धा जिल्हय़ातील दोन चोरट्यांनाही पोलिसांनी अटक केली असून त्यांना रविवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
वृंदावन नगर येथील रहिवासी इंद्रनिल देशमुख यांची एम एच ३0 एए ९८९ क्रमांकाची कार २0१४ मध्ये चोरीस गेली होती. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. यामध्ये सदर कार वर्धा जिल्हय़ातील हिंगणघाट येथील रहिवासी रघ्या ऊर्फ सूरज रामभाऊ वखारकर आणि देवडी येथील रहिवासी प्रफुल्ल ऊर्फ बबलू गजानन गांगेकर या दोघांनी चोरल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी वर्धा येथून सदर दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून कार जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई सिव्हिल लाइन्सचे पीएसआय संतोष अघाव यांनी केली.
असा झाला उलगडा
वर्धा पोलिसांनी वाहन चोरीतील एका टोळीला गजाआड केले. यामध्ये सूरज आणि प्रफुल्ल हे दोघेही सहभागी होते. त्यांची कसून चौकशी केली असता या दोघांनी अकोल्यातूनही कार चोरी केल्याची कबुली दिली.