तीन वर्षांतील रस्ते कामांच्या दर्जाची होणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 01:28 PM2018-08-07T13:28:56+5:302018-08-07T13:30:53+5:30
त्यानुसार आता गत तीन वर्षात अकोला शहरात करण्यात आलेल्या रस्ते कामांचे त्रयस्थ यंत्रणेकडून तांत्रिक ‘आॅडिट’ करण्यात येणार आहे असून, या तपासणीची कार्यवाही लवकरच करण्यात येणार आहे.
- संतोष येलकर
अकोला: शासनाच्या निधीतून सन २०१५-१६ ते २०१७-१८ या तीन वर्षाच्या कालावधीत अकोला शहरात करण्यात आलेल्या रस्ते कामांच्या दर्जाची त्रयस्थ यंत्रणेकडून तपासणी करून, अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश शासनाच्या नगर विकास विभागाचे अवर सचिव विवेक कुंभार यांनी ४ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांना दिला. त्यानुसार आता शहरात गत तीन वर्षात करण्यात आलेल्या रस्ते कामांच्या दर्जाची तपासणी करण्यात येणार आहे.
शासनाच्या नगरविकास विभागामार्फत गत २८ मार्च २०१८ रोजी घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून करण्यात येणाऱ्या विकास कामांच्या दर्जासंदर्भात त्रयस्थ यंत्रणेकडून तांत्रिक लेखापरीक्षण (आॅडिट) करण्याची व्यवस्था अमलात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात शासनाच्या नगर विकास विभागाकडून सन २०१५-१६ ते सन २०१७-१८ या कालावधीत वितरित निधीतून करण्यात आलेल्या रस्ते कामांच्या दर्जाची तपासणी त्रयस्थ यंत्रणेकडून करण्यात यावी आणि यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश नगर विकास विभागाचे अवर सचिव विवेक कुंभार यांनी ४ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांना दिला. त्यानुसार आता गत तीन वर्षात अकोला शहरात करण्यात आलेल्या रस्ते कामांचे त्रयस्थ यंत्रणेकडून तांत्रिक ‘आॅडिट’ करण्यात येणार आहे असून, या तपासणीची कार्यवाही लवकरच करण्यात येणार आहे.
प्रत्येक ठेकेदारांनी केलेल्या रस्ते कामांची होणार तपासणी!
गत तीन वर्षांच्या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या रस्ते कामांच्या तपासणीत प्रत्येक ठेकेदारांनी केलेल्या कामांपैकी किमान एका रस्त्याच्या कामाची तपासणी करण्यासंदर्भात खबरदारी घेण्यात यावी, असे निर्देशही नगर विकास विभागाच्या अवर सचिवांनी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना आदेशात दिले आहेत.
‘सोशल आॅडिट’ची दखल!
कामे पूर्ण झाल्यानंतर वर्षभरातच रस्त्यांवर खड्डे पडल्याने, जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार शहरातील रस्ते कामांचे सामाजिक व तांत्रिक अंकेक्षण (आॅडिट) सुरू करण्यात आले. त्यामध्ये घेण्यात आलेले सहा रस्ते कामांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. या ‘सोशल आॅडिट’ची दखल घेत आता शासनामार्फत गत तीन वर्षात करण्यात आलेल्या रस्ते कामांची तांत्रिक तपासणी करण्याचा आदेश दिला आहे.
शासनाच्या निधीतून गत तीन वर्षात अकोला शहरात करण्यात आलेल्या रस्ते कामांच्या दर्जाची त्रयस्थ यंत्रणेकडून तपासणी करण्याचा आदेश शासनाच्या नगर विकास खात्याच्या अवर सचिवांकडून प्राप्त झाला आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.
- आस्तिककुमार पाण्डेय,
जिल्हाधिकारी