तीन वर्षांपासून तहानलेल्यांची नि:स्वार्थ सेवा, महादेव तायडे देताहेत बोअरचे मोफत पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 10:02 AM2018-04-11T10:02:41+5:302018-04-11T10:02:41+5:30
आज समाजात माणूसपण उरले नाही, सर्व जग स्वार्थी आहे, अशी ओरड सुरू आहे. कलियुग आहे, असे उत्तर देऊन अनेक जण मोकळे होतात; परंतु आजही समाजात नि:स्वार्थ सेवा करणाऱ्यांची संख्या कमी नाही.
बोरगाव मंजू (अकोला) : आज समाजात माणूसपण उरले नाही, सर्व जग स्वार्थी आहे, अशी ओरड सुरू आहे. कलियुग आहे, असे उत्तर देऊन अनेक जण मोकळे होतात; परंतु आजही समाजात नि:स्वार्थ सेवा करणाऱ्यांची संख्या कमी नाही. पाण्याचा धर्म आता राहिला नसून, व्यवसाय झाला आहे. पाणपोई दिसेनाशी झाली असून, पाणी विक्रीचा व्यवसाय उभारल्याचे चित्र गावोगावी आहे. अशा परिस्थितीत आपल्या बोअरला लागलेल्या मुबलक पाण्याची विक्री न करता ते तहानलेल्या लोकांना मोफत वितरित करण्याचा उपक्रम महादेवराव तायडे राबवित आहेत.
गत पाच ते सात वर्षे झाली, निसर्गाच्या लहरीपणामुळे अपुरा व अवेळी पाऊस पडल्याने भूजल पातळी खोल गेली. त्यामुळे नदी, नाले, विंधन विहिरी आठल्या. शहरातील विविध भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे, तर शासनाने काही भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे. लोकसंख्या लक्षात घेता सदर पाणी पुरवठा अपुरा आहे. तहान भागविण्यासाठी रानोरान भटकंती करावी लागत असतानाच गत तीन वर्षांपासून येथील प्रतिष्ठित व्यावसायिक महादेवराव तायडे हे भीषण पाणी टंचाईच्या काळात माळीपुरा भागासह इतरही भागात आपल्या बोअरवरून नागरिकांना मोफत पाणी वितरित करीत आहेत. गत दोन वर्षांपासून येथील प्रतिष्ठित व्यावसायिक महादेवराव तायडे हे मोफत पाणी वितरण करून सेवा देतात, तर यावर्षीसुद्धा आपल्या बोअरद्वारे नागरिकांना पाणी देत आहेत. त्यांच्या बोअरवर पाणी भरण्यासाठी नागरिकांची गर्दी असते. सोबतच मुक्या जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. (वार्ताहर)