अकोल्यात ‘बर्निंग बस’चा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 12:32 PM2020-06-01T12:32:28+5:302020-06-01T12:33:11+5:30
पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसला अचानक आग लागली.
अकोला : अकोला शहरात जनता कर्फ्यू पाळला जात असताना सोमवारी सकाळी स्थानिक आळशी प्लॉट परिसरात पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसला अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली.
आळशी प्लॉट परिसरातील पेट्रोल पंपाजवळ तुषार ट्रॅव्हल्सची एम.एच. ३० एए ९५९५ क्रमांकाची बस उभी होती. सोमवारी सकाळी या बसला अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच स्थानिक रहिवाशांनी याबाबत अग्निशामक दलाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण बसला वेढले होते. दोन्ही बंबांमधून पाण्याचा मारा करण्यात आल्यानंतर आग विझली. परंतु तोपर्यंत संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. आग लागली तेथून हाकेच्या अंतरावर पेट्रोलपंप आहे. सुदैवाने आग लवकर आटोक्यात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. बसला आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले आहे.