२५ फूट खोल विहिरीत पडलेल्या नागाच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2021 10:48 AM2021-08-31T10:48:44+5:302021-08-31T10:49:00+5:30
Thrill of a cobra rescue operation : सर्पमित्र बाळ काळणे यांनी विहिरीत पडलेल्या नागला जीवनदान देऊन आणखी एका सापाचे रक्षण केले.
अकोला : तब्बल २५ फूट खोल व केवळ सहा फूट व्यासाच्या विहिरीत काळा विषारी नाग अडकलेला... चिंचोळी जागा असल्याने नाग कधीही दंश करण्याचा धोका, वर बघ्यांची मोठी गर्दी... मोठ्या शिताफीने नागाला पकडल्या जाते व सुखरूप बाहेर काढले जाते... हा थरार रविवारी पातूर तालुक्यातील तांदळी गावातील लोकांनी अनुभवला. मानद वन्यजीव रक्षक तथा सर्पमित्र बाळ काळणे यांनी विहिरीत पडलेल्या नागला जीवनदान देऊन आणखी एका सापाचे रक्षण केले.
पातूर तालुक्यातील तांदळी येथील एका शेतातील कोरड्या विहिरीत नाग असल्याची माहिती ग्रामस्थांनी सर्पमित्र बाळ काळणे यांना दिली. माहिती मिळताच बाळ काळणे हे आपल्या सहकाऱ्यांसह तांदळी येथे पोहोचले. त्यावेळी विहिरीजवळ गावकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. ही विहीर अत्यंत चिंचोळी असून, कोरडी आहे. दोरी व शिडीच्या साहाय्याने बाळ काळणे व त्यांचे सहकारी विहिरीत उतरले. आतमध्ये जागा कमी असल्याने नाग दंश करण्याचा धोका होता. त्यांना पाच फूट लांबीचा काळा नाग विहिरीत दिसून आला. नागाला पकडून वर आणले व नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सर्पमित्र शशिकांत महाजन, सर्पमित्र दीपक डाखोरे यांनी मोलाचे सहकार्य केले. गावातील लोकांच्या सहकार्यामुळे हे थरारक रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झाल्याचे बाळ काळणे यांनी सांगितले. यावेळी सरपंच राजेश काळमेघ, गणेश नवघरे, श्रीकांत महल्ले, मारुती सोनटक्के, उमेश वानखडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.