कौलखेड चौकात दुचाकी चालकाचा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:17 AM2021-03-06T04:17:51+5:302021-03-06T04:17:51+5:30
तीन दुचाकींना दिली धडक एक महिला गंभीर जखमी अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौलखेड चौक परिसरात एका भरधाव ...
तीन दुचाकींना दिली धडक
एक महिला गंभीर जखमी
अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौलखेड चौक परिसरात एका भरधाव दुचाकी चालकाने तीन दुचाकींना जबर धडक दिल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या दुचाकी चालकाने मागोमाग तीन दुचाकींना धडक दिल्याने या अपघातात खडकी परिसरातील रहिवासी एक महिला गंभीर जखमी झाली असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कौलखेड चौकासमोर सागर फर्निचर दुकान असून या दुकानासमोर एम एच ३० बिके ०६२९ या लाल आणि काळा रंगाच्या पल्सरच्या चालकाने भरधाव वेगात दुचाकी चालवली. यावेळी त्याने तीन दुचाकींना जबर धडक दिली. या अपघातात खडकी येथील रहिवासी सुनीता राठोड नामक महिलेच्या हाताला व एका पायाला गंभीर दुखापत झाली आहे. नागरिकांनी दुचाकी चालकाला तातडीने ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. तर गंभीर जखमी महिलेला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा युवक मद्यधुंद अवस्थेत असल्याची चर्चा घटनास्थळावर होती. एक नव्हे तर तीन दुचाकींना त्याने धडक दिल्याने कौलखेड चौकाने थरार अनुभवला. भरधाव वेगात दुचाकी चालवत अनेकांना धडक दिल्यामुळे नागरिकांनी त्याला चोप देण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलीस पोहचल्याने त्यास ताब्यात घेऊन खदान पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. याप्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध खदान पोलीस गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती आहे.