चोरट्यांचा धुमाकूळ, पोलीस मात्र कूल!
By admin | Published: January 22, 2015 01:57 AM2015-01-22T01:57:14+5:302015-01-22T01:57:14+5:30
अकोला पोलिसांची गस्त केवळ नावालाच.
अकोला: गत महिनाभरापासून शहरात लुटमार, घरफोडी, चेन स्नॅचिंगच्या आणि खंडणी मागणीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आठवडाभरापासून शहरामध्ये चोरटे, घरफोड्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला असून, पोलीस मात्र कूल आहेत. घटना घडल्यानंतर पोलीस केवळ अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करतात आणि तपास सुरू असल्याचे सांगतात. मात्र घटना घडून वर्ष, दोन वर्ष उलटून जातात, तरी घटनांचा तपासही होत नाही आणि चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न होत नाही.
गत महिनाभरामध्ये शहरामध्ये लुटमारीच्या चार, चेन स्नॅचिंगच्या सहा, कारमधील रोकड लंपास केल्याच्या, चोरीच्या, घरफोडीच्या घटना घडल्या; परंतु या घटनांचा तपास करण्यामध्ये पोलीस यंत्रणेला अपयश येत आहे. शहरामध्ये गुन्हेगारी वाढत आहे. खंडणी, धमक्यांच्या प्रकारांसोबतच व्यापार्यांना मारहाण करून त्यांच्याकडील रोख लुटून नेण्याच्या घटना वाढल्या. महिलांच्या गळय़ातील मंगळसूत्र, सोनसाखळी हिसकावून नेण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली. तसेच घरफोडी व चोरी करून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याच्या घटनाही घडत आहेत. पोलीस ठाण्यामध्ये तक्रारींनुसार आरोपींवर गुन्हा दाखल होतो; परंतु या घटनांचा तपास मात्र वर्षोगणती लागत नाही. तक्रारकर्ता पोलीस ठाण्याच्या पायर्या झिजवून कंटाळतो; परंतु त्याला समाधानकारक उत्तर मिळत नाही. पोलिसांकडून गुन्हा दाखल केला आहे, तपास सुरू आहे. एवढेच सांगून त्याची बोळवण केली जाते. प्रसंगी त्याला शिवीगाळ करून पोलीस ठाण्यामधून हाकलून देण्याचे प्रकार घडतात. या प्रकारांमुळे अनेक नागरिक पोलिस ठाण्यात तक्रार देण्याच्या भानगडीत पडतदेखील नाहीत.
*दीड महिन्यांमधील घटनांचा आलेख
चोरी २१
घरफोडी १0
चेन स्नॅचिंग १३
खंडणी 0४
लूटमार 0६
*गत पंधरा दिवसांमधील घटना
चोरी 0५
घरफोडी 0४
चेन स्नॅचिंग 0३
लूटमार 0२