मेळघाटातील वाघांचा संचार वाढतोय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:13 PM2019-01-18T12:13:40+5:302019-01-18T12:15:01+5:30
अकोला: मेळघाटातील वाघांच्या वाढत्या संचाराची माहिती घेतली असता मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सध्या ४९ तरुण वाघ आणि २२ वाघांच्या बछड्यांचा मुक्त संचार असल्याचे समोर आले आहे.
- राजेश शेगोकार
अकोला: अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्याच्या पिंप्री जैनपूर, पिंप्री खुर्द शेतशिवारात मंगळवारी वाघ आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गावाजवळील केळीच्या शेतात वाघोबा चक्क दिवसभर ठाण मांडून बसले होते. या पृष्ठभूमीवर मेळघाटातील वाघांच्या वाढत्या संचाराची माहिती घेतली असता मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सध्या ४९ तरुण वाघ आणि २२ वाघांच्या बछड्यांचा मुक्त संचार असल्याचे समोर आले आहे. व्याघ्र प्रकल्पातील गावांचे पुनवर्सन झाल्याने वाघाला मोकळा श्वास मिळाला हे जरी खरे असले तरी वाघांचा संचार चिंता वाढविणारा आहे.
मेळघाटातील अंबाबरवा व संलग्नित वनगावांचे यशस्वी पुनवर्सन झाल्याने काही प्रमाणात वाघांचा संचार मार्ग मोकळा झाला आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे असलेल्या माहितीवरून या क्षेत्रात तब्बल ४९ तरुण वाघ आणि २२ वाघांचे बछडे आहेत. व्याघ्र अधिवासात शिकारीची कमतरता भासली म्हणून वाघ त्यांच्या क्षेत्राबाहेर येतात. प्रादेशिक वनक्षेत्रातील वन जमिनीवर वाढणारे अतिक्रमण, विकास प्रकल्प, अवैध गुरे चराई, रस्त्यांचा विकास, वाढती शिकार, संचार मार्गाचा होणारा ºहास अशा कारणामुळे जंगलांची अवस्था बिकट होत आहे. म्हणून वाघांचा आणि मानवांचा संघर्ष होताना आपण पाहतो आहे. एकीकडे गेल्या वर्षभरात व्याघ्र हल्ल्यात भारतात सर्वाधिक माणसांचे मृत्यू १५ विदर्भात झाले असताना दुसरीकडे २० वाघांना आपला जीवही गमवावा लागला आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील बुलडाणा जिह्यातील अंबाबरवा अभयारण्य हा अतिशय महत्त्वाचा संचार मार्ग आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा वनक्षेत्र व यावल अभयारण्य, पुढे अकोला जिल्ह्यातील वान अभयारण्य, उत्तरेकडे रावेर वनक्षेत्र मार्गे यावल तर पुढे अनेरडॅम (धुळे) अभयारण्याशी हे क्षेत्र जोडलेले आहे. मेळघाटमधील वाघ वान, अंबाबरवा मार्गे वडोदा वनक्षेत्रात संचार करतात. त्यामुळेच वाघांचे शितशिवारात दर्शन वाढले असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने वाघ अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. वाघ टिकला तरच अन्नसाखळी व परिसंस्था समृद्ध राहते. आपण वाघाला मोकळा श्वास दिला पाहिजे. गावालगत वाघांचे दर्शन होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये साहजिकच भीतीचे वातावरण निर्माण होते; मात्र त्यासाठी वन विभागाची मदत घेऊन उपाय शोधणे गरजेचे आहे.
- यादव तरटे पाटील,
वन्यजीव अभ्यासक, अमरावती.