शिवपूर परिसरात दोन बछड्यांसह वाघ आढळला
By admin | Published: November 14, 2016 02:55 AM2016-11-14T02:55:30+5:302016-11-14T02:55:30+5:30
ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण.
शिवपूर(जि.अकोला), दि. १३- शेतशिवारात काही मजुरांना दोन बछड्यांसह वाघ आढळल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वाघाने काही दिवसांपूर्वी एका बकरीची शिकार केली होती. या वाघाला वन विभागाने जंगलात सोडावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शिवपूर येथील नदीच्या काठावरील शेतात १३ नोव्हेंबर रोजी काही शेतमजुरांना दोन बछड्यांसह वाघ आढळला. या शेतमजुरांनी ही बाब गावात येऊन सांगितली. त्यानंतर वाघाला पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. याविषयी वन विभागाच्या अधिकार्यांना माहिती देण्यात आली. दुपारी वन विभागाच्या अधिकार्यांनी या वाघाला शोधण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी या भागात एका बकरीची शिकार झाली होती.
ती शिकारही वाघानेच केल्याचा अंदाज शेतकर्यांनी व्यक्त केला आहे. वाघाचा वावर असल्याची वार्ता गावात पोहोचल्याने शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या शिवपूर परिसरात शेतीची कामे सुरू आहेत; परंतु आता कामे करण्यास जाण्यासाठी शेतकरी घाबरत असल्याचे चित्र आहे.
वन विभागाला आढळले ठसे
शेतमजुरांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर वन विभागाच्या अधिकारी कर्मचार्यांनी शोध मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान वन विभागाला वाघाच्या पायाचे ठसे आढळले आहेत. या परिसरात वाघाचा वावर आहे, याला वन विभागानेही दुजोरा दिला आहे. तसेच वन विभागाने ग्रामस्थांची गर्दी पोलिसांच्या मदतीने हटविली आहे. या मादी वाघाने नुकताच दोन बछड्यांना जन्म दिला असल्याने एकाच जागेवर राहत असल्याचे ठशांवरून आढळले. त्यामुळे, सध्या त्यांच्यावर वन विभागाच्या वतीने केवळ वॉच ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना जंगलात सोडण्यात येणार असल्याचे वन विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.