जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा वाजला बिगुल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:35 AM2020-12-12T04:35:26+5:302020-12-12T04:35:26+5:30
अकोला: ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केला असून, त्यामध्ये जिल्ह्यातील मुदत संपलेल्या २२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा ...
अकोला: ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केला असून, त्यामध्ये जिल्ह्यातील मुदत संपलेल्या २२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान घेण्यात येणार असून, निवडणुकीचा आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
एप्रिल ते डिसेंबर अखेरपर्यंत मुदत संपणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगामार्फत जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यातील मुदत संपलेल्या २२५ ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी १५ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार असून, ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने, आचारसंहिता अंमलबजावणीसह निवडणुकीच्या तयारीचे काम जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले आहे.
निवडणूक होत असलेल्या
ग्रामपंचायतींची अशी आहे संख्या!
तालुका ग्रा.पं.
अकोला ३६
अकोट ३८
बाळापूर ३८
बार्शीटाकळी २७
पातूर २३
मूर्तिजापूर २९
तेल्हारा ३४
......................................
एकूण २२५
अंतिम मतदार यादी
१४ डिसेंबरला होणार प्रसिध्द!
जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींची मतदार यादी १४ डिसेंबर रोजी प्रशासनामार्फत प्रसिध्द करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील तहसील कार्यालय, पंचायत समिती व संबंधित ग्रामपंचायतींच्या ठिकाणी ग्रामपंचायतींची अंतीम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
गावागावात इच्छुकांची
तयारी सुरू!
ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील गावागावांत ग्रामपंचायतींची निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.