गृहरक्षक दलातील जवानांवर उपासमारीची वेळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:13 AM2021-05-03T04:13:20+5:302021-05-03T04:13:20+5:30
मूर्तिजापूर : गेल्या सहा महिन्यांपासून गृहरक्षक दलातील जवानांना वेतन अद्यापही मिळालेले नसल्यामुळे गृहरक्षक दलातील जवानांवर आर्थिक संकट ओढवले असून ...
मूर्तिजापूर : गेल्या सहा महिन्यांपासून गृहरक्षक दलातील जवानांना वेतन अद्यापही मिळालेले नसल्यामुळे गृहरक्षक दलातील जवानांवर आर्थिक संकट ओढवले असून उपासमारीची वेळ आल्याचे चित्र दिसून येत आहे.
मूर्तिजापूर येथील जवळपास पुरुष व महिला मिळून १०८ गृहरक्षक दलाचे जवान कार्यरत आहेत. त्यामध्ये ५० वर्षांवरील गृहरक्षक दलातील जवानांना बंदोबस्त पासून, वंचित ठेवण्यात आलेले आहे. सध्या जिल्ह्यात ७०० च्या जवळपास महिला व पुरुष मिळून जवान कोविड-१९ काळात बंदोबस्तावर कार्यरत असून, नोव्हेंबर २०२० पासून तुटपुंज्या मानधनावर पोलिसांसोबत कर्तव्य बजावत आहेत. मानधनाचे पैसे मिळाले नसल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. गृहरक्षक दलाचे जवान हे कर्तव्याच्या ठिकाणापासून ३० ते ४० किलोमीटर अंतरावरून बंदोबस्तासाठी येतात. त्यामुळे त्यांचा रोजचा खर्च व परिवाराला सांभाळणे अशा विवंचनेत गृहरक्षक दलाचे जवान सापडले आहेत. शासनाने याकडे लक्ष देऊन मानधन त्वरित देण्याची मागणी गृहरक्षक दलातील जवानांकडून होत आहे. मानधनासह त्यांना इतरही सुविधा दिल्या जाव्या, अशी मागणीदेखील होत आहे.