सहा महिन्यांतच सिमेंट रस्त्यांच्या दुरुस्तीची वेळ
By admin | Published: May 22, 2017 02:00 AM2017-05-22T02:00:51+5:302017-05-22T02:00:51+5:30
दुर्गा चौक ते अग्रसेन चौक, सिव्हिल लाइन रोडवर पॅचिंगची कामे
आशिष गावंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला:मोठा गाजावाजा करीत शहरात निर्माण केलेल्या सिमेंट रस्त्यांची दुरुस्ती करण्याची वेळ संबंधित कंत्राटदारासह महापालिका प्रशासनावर आली आहे. रस्ता तयार केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच दुर्गा चौक ते अग्रसेन चौक आणि सिव्हिल लाइन रोडवर बारीक भेगा निर्माण झाल्या असून, ठिकठिकाणी रस्त्यावरील रेती उखडून जाण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराने दोन्ही रस्त्यांच्या पॅचिंगची कामे सुरू केली असून, रस्त्यावर ‘प्लास्टिक सायजर लिक्विड’ टाकून काम पूर्ण केले जात असल्याचे चित्र आहे.
तत्कालीन काँग्रेस सरकारच्या कालावधीत अतिवृष्टीमुळे दुरवस्था झालेल्या मुख्य रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेला २०१२-१३ मध्ये १५ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. त्यावेळी मनपा प्रशासनाने १८ रस्त्यांची यादी तयार करून १२ रस्ते डांबरीकरणाचे तर उर्वरित सहा रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्याचा निर्णय घेतला होता. तत्कालीन मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी १८ फूट रुंद याप्रमाणे सिमेंट रस्त्यांची निविदा तयार केली होती. महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी सिमेंट रस्त्यांच्या ‘वर्किंग एस्टीमेट’मध्ये बदल करीत ३८ फूट रुंदीप्रमाणे रस्त्यांची नव्याने निविदा प्रकाशित केली. स्थानिक आरआरसी कन्स्ट्रक्शन कंपनीला सिमेंट रस्त्यांची कामे दिली. मोठा गाजावाजा करीत सिमेंट रस्त्यांची कामे सुरू केली असता कामांचा दर्जा व गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. सिव्हिल लाइन ते मुख्य पोस्ट आॅफिस चौक आणि दुर्गा चौक ते अग्रसेन चौकपर्यंत प्रशस्त सिमेंट रस्ता तयार केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच रस्त्यावर भेगा निर्माण झाल्या असून, ठिकठिकाणी रेती उखडण्याचे प्रकार समोर येत आहेत. या प्रकारामुळे सिमेंट रस्त्यांची कामे कितपत दर्जेदार झाली, याबद्दल अकोलेकरांमध्ये चर्चेला ऊत आला आहे.
मनपाने जारी केले पत्र
दुर्गा चौक ते अग्रसेन चौक आणि सिव्हिल लाइन रोडवर भेगा निर्माण झाल्या असून, रस्त्यावरील रेती निघून गिट्टीचा थर वर आल्याचे चित्र आहे. ही बाब लक्षात घेता मध्यंतरी संबंधित कंत्राटदारांने प्लास्टिक सायजर लिक्विड टाकून त्यावर सुती पोते टाकण्यास सुरुवात केली. सिव्हील लाइन रस्त्याच्या पाठोपाठ लेडी हार्डिंग रुग्णालयासमोरील रस्त्यावरदेखील असाच प्रकार होत असल्याने यासंदर्भात मनपाने कंत्राटदाराला पत्र जारी केल्याची माहिती आहे.
तीन रस्त्यांची कामे पूर्ण
२ कोटी ४५ लाख ५९ हजार रुपयांतून माळीपुरा ते मोहता मिल चौक सिमेंट रस्ता पूर्ण करण्यात आला. मुख्य पोस्ट आॅफिस ते सिव्हिल लाइन चौकपर्यंतच्या सिमेंट रस्त्यासाठी मनपाने २ कोटी ९२ लाख ४८ हजार रुपयांची तरतूद केली होती.
दुर्गा चौक ते अग्रसेन चौकपर्यंत ५२० मीटर लांब आणि १२ मीटर रुंद रस्त्यासाठी २ कोटी ४० लाखांची तरतूद करण्यात आली होती. नोव्हेंबर २०१६ मध्ये हा सिमेंट रस्ता पूर्ण केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात रस्त्याचे पॅचिंग करण्याची वेळ आली आहे.
दावे-प्रतिदावे सुरू; पण रस्त्याचे काय?
सिमेंट रस्ता तयार करतेवेळी सिमेंटचे पाणी आणि रेतीचा काही भाग वर येतो त्याला ‘स्लरी’असे संबोधल्या जाते. दुर्गा चौक ते अग्रसेन चौक रस्त्यावरील ही ‘स्लरी’हटविण्याची सूचना बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केल्याचा दावा कंत्राटदाराकडून होत आहे. मनपाकडूनदेखील प्रतिदावे होत आहेत. असे असले तरी या प्रकारामुळे रस्त्याचे आयुर्मान नेमके किती राहील, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेल्या सिमेंट रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची अट केवळ ६ महिने नमूद आहे, हे येथे उल्लेखनीय.
सिमेंट रस्त्यासाठी लागणारे सिमेंट, रेती, गिट्टी व पाणी यांचे प्रमाण किती असावे याचे निकष आहेत. कंत्राटदार निकषानुसार कामकाज करतो की नाही, हे तपासण्याची जाबाबदारी प्रशासनाची आहे. संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराला जबाबदारी झटकता येणार नाही. प्रशासनाला जाब विचारला जाईल.
-विजय अग्रवाल, महापौर
रस्ता तयार करताना गडबड नेमकी कोठे झाली, याचा शोध घेतला जाईल. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्ता तपासण्याची सूचना देतो. हलगर्जीपणा झाला असेल तर कंत्राटदाराला दंड आकारण्याची तरतूद आहे.
- अजय लहाने, आयुक्त मनपा
दुर्गा चौकातील सिमेंट रस्त्यावरील ‘स्लरी’ काढण्याची सूचना बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी केली होती. त्यामुळे लिक्विड लावण्याची वेळ आली आहे; परंतु काळजी करण्याचे कारण नाही. स्लरी निघत असली तरी रस्त्याचा दर्जा टिकाऊ राहील, यात शंका नाही.
- प्रदीप देशमुख, कंत्राटदार, आरसीसी कन्स्ट्रक्शन