जिल्ह्यातील १५० नृत्य कलावंतांवर उपासमारीची वेळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:18 AM2021-04-20T04:18:52+5:302021-04-20T04:18:52+5:30
रवी दामोदर अकोला: कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला असून, यामधून नृत्य कलावंतही सुटले नाहीत. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ...
रवी दामोदर
अकोला: कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला असून, यामधून नृत्य कलावंतही सुटले नाहीत. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व स्तरांतील व्यावसायिकांना झळ सोसावी लागत आहे. जिल्ह्यातील खेड्यापाड्यांतील नृत्य कलावंतांचे नृत्यवर्ग (डान्स क्लास) हे उपजीविकेचे महत्त्वाचे साधन आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नृत्यवर्ग बंद असल्याने जिल्ह्यातील जवळपास १५० नृत्य कलांवतांवर उपासमारीची वेळ आली आहे.
शालेय सांस्कृतिक कार्यक्रम, लग्नातील सांगीतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा आदींच्या माध्यमांतून हा व्यवसाय उदयास आला आहे. मात्र, कोरोनाचे संकट येऊन ठेपले आणि नृत्यवर्गावर अवलंबून असणारे अनेक कलावंत आता रस्त्यावर आले आहेत. जिल्ह्यात जवळपास १५० नृत्य प्रशिक्षक असून, ६००० विद्यार्थी प्रशिक्षण घेतात. शहरात तब्बल ५० ते ६० क्लास आहेत. जिल्ह्यातील नृत्यकलावंतांसमोर मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यांच्याकडे रोजगाराचे दुसरे कोणतेही साधन नाही. नृत्य शिकवून, नृत्यकला जोपासून ते आपला उदरनिर्वाह करीत आहेत. जिल्ह्यातील १५० हून अधिक नृत्य शिक्षक जिल्ह्यातील विविध भागांत शिकवणी वर्ग घेऊन कलेची जोपासना करीत आहेत. यातून ते सांस्कृतिक वारसा जतन करीत आहेत. मात्र, कोरोनाकाळात लॉकडाऊनच्या नियमान्वये डान्स क्लास बंद आहेत. परिणामी त्यांच्याजवळचा होता नव्हता रोजगारही निघून गेला. आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. संचारबंदीमुळे प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर नृत्यकलेमध्ये आपले करियर करू पाहणाऱ्यांमध्ये जगण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. नवीन पिढी या कलेपासून दुरावण्याची शक्यता वाढली आहे.
----------------------------------
६००० नवीन पिढीसमोर संकट
शहरासह ग्रामीण भागात जवळपास ६००० युवक नृत्यकला शिकत आहेत. मात्र, वर्ग बंद असल्यामुळे त्यांच्यासमोर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. शिक्षकांवरही संक्रांत आली आहे. यामुळे नवीन पिढी नृत्यकलेपासून दूर जाण्याचा धोका वाढला आहे. ही कला आता कोण जोपासणार, असा प्रश्न आहे.
-----------------------------
शासनाने समाजातील इतर घटकांना लॉकडाऊनच्या काळात जशी मदत केली, तशीच नृत्य कलावंतांनाही तत्काळ भरघोस मदत जाहीर करावी. नाही तर दिवसातून किमान २ तास शिकविण्यासाठी परवानगी द्यावी. शासनाने समस्या जाणून लोककलावंतांना जगण्यास उभारी द्यावी.
- अमोल हिवाळे,
जिल्हाध्यक्ष, नृत्य परिषद, महाराष्ट्र राज्य.
-------------------------------------------------
जिल्ह्यातील एकूण कोरीओग्राफर- १५०
जिल्ह्यात एकूण प्रशिक्षण घेत असलेले युवक- ६०००
शहरात एकूण डान्स क्लास- ६०