गंभीर आजारांपासून दूर राहण्यासाठी वेळेत उपचार आवश्यक! - सौरभ कटियार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 06:58 PM2020-12-04T18:58:34+5:302020-12-04T18:58:51+5:30
Akola News वेळेत उपचार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी केले.
अकोला: क्षयरोग व कुष्ठरोग यासारख्या आजारांपासून दूर राहण्यासाठी वेळेत उपचार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी केले. राज्यभरात १ डिसेंबरपासून क्षयरोग व कुष्ठरोग रुग्ण शोध मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली. त्या अनुषंगाने मोहिमेच्या जिल्हास्तरीय उद्घाटन कार्यक्रमाचे उद्घाटन शुक्रवार ४ डिसेंबर रोजी कापशी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषणातून ते बोलत होते. क्षयरोग हा अतिशय गंभीर आजार असून, रुग्णांनी वेळेत तपासणी करून औषधोपचार घेण्याची आवश्यकता आहे. सध्या कोविडसारख्या आजारामध्ये जेवढे मृत्यू झाले नाहीत, त्यापेक्षा जास्त मृत्यू क्षयरोगामुळे झाले आहेत. क्षयरोगावर वेळेवर औषधोपचार घेतल्यास रुग्ण शंभर टक्के बरा होऊ शकतो. तसेच कुष्ठरोग या आजारावरसुद्धा चांगली औषधे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मोहिमेदरम्यान येणाऱ्या पथकांकडून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, यासाठी ग्रामीण व शहरी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास कुष्ठरोग विभागाचे साहायक संचालक डॉ. एम.एम. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, तालुका आरोग्य अधिकारी जगदीश बन्सोडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, डॉ. अर्चना महल्ले, डॉ. मोरवाल आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. संचालन जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी यांनी, तर आभार आरोग्य सहायक डाबेराव यांनी मानले.