रिधोरा येथील कॅन्सर हॉस्पिटलला टीना अंबानींची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 02:54 PM2018-10-15T14:54:32+5:302018-10-15T16:07:04+5:30
व्याळा (अकोला) : जिल्ह्यातील रिधोरा येथे कोकीळाबेन धिरुभाई अंबानी हॉस्पिटल अॅन्ड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट तर्फे उभारण्यात आलेल्या कॅन्सर हॉस्पिटलची पाहणी करण्यासाठी टिना अंबानी यांनी सोमवारी हॉस्पिटलला भेट दिली.
- अनिल गिऱ्हे
व्याळा (अकोला) : जिल्ह्यातील रिधोरा येथे कोकीळाबेन धिरुभाई अंबानी हॉस्पिटल अॅन्ड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट तर्फे उभारण्यात आलेल्या कॅन्सर हॉस्पिटलची पाहणी करण्यासाठी टिना अंबानी यांनी सोमवारी हॉस्पिटलला भेट दिली. हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या पुजाविधीत सहभागी होण्यासाठी त्या आल्या होत्या.
दुपारी १२ वाजताच्या सुमारास टिना अंबानी यांचे खासगी विमानाद्वारे अकोला विमानतळावर आगमण झाले. त्यानंतर त्यांचा ताफा राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा वरील रिधारा गावाकडे रवाना झाला. रिधोरा ते व्याळा दरम्यानच्या कलकत्ता धाबा जवळ रिलायन्स समहुातर्फे कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात आले असून, या हॉस्पिटलची पाहणी करण्यासाठी टिना अंबानी आल्याचे त्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले. हॉस्पिटलच्या इमारतीचे काम पूर्णत्वास आले असून, सोमवारी या ठिकाणी पुजाविधी आटोपण्यात आला. टिना अंबानी या सोहळ्यात सहभागी झाल्या. त्यांच्यासोबत गव्हर्निंग कौन्सिल सदस्य के. नारायण, तूषार मोतीवाला यांच्यासह कार्यकारी संचालक डॉ. रामनारायणन, संतोष शेट्टी, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार हरिष पिंपळे यांची उपस्थिती होती.
लवकरच होणार लोकार्पण
कॅन्सर हॉस्पिटलचे काम जवळपास पूर्ण झाले असून, येत्या काही दिवसांमध्ये हॉस्पिटलचे लोकार्पण होणार आहे. त्याची तयारी म्हणून टिना अंबानी येथे आल्याची माहिती आहे.
विमानतळावर घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
रिधारो येथून परत अकोला येथील शिवनी विमानतळावर आल्यानंतर टिना अंबानी यांनी बुलडाणा येथील आढावा बैठक आटोपून परतीच्या प्रवासाला निघालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. याप्रसंगी दोघांमध्ये औपचारिक चर्चा झाली. टिना अंबानी यांनी हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याची विनंती केली.