थकीत कर भोवला; भोजनालयाला टाळे
By admin | Published: April 11, 2017 01:36 AM2017-04-11T01:36:47+5:302017-04-11T01:36:47+5:30
कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणार्या व्यावसायिकांवरही मनपाने कारवाईचा बडगा उगारला.
अकोला: महापालिकेचा थकीत मालमत्ता कर जमा न करणार्या रेल्वेस्थानक चौकातील शिवशंकर भोजनालयाला टाळे लावण्याची कारवाई सोमवारी महापालिकेच्या मालमत्ता वसुली पथकाने केली. तर दुसरीकडे ५0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणार्या व्यावसायिकांवरही मनपाने कारवाईचा बडगा उगारला.
अकोलेकरांनी मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत थकीत मालमत्ता कर मनपाकडे जमा करणे अपेक्षित होते. मागील अनेक महिन्यांपासून मनपाच्या मालमत्ता वसुली पथकाकडून कर वसुलीचे काम सुरू आहे. रेल्वेस्थानक चौकातील शिवशंकर भोजनालयाच्या संचालकांकडे २00८ पासून ६१ हजार ९११ रुपये मालमत्ता कर थकीत होता. संबंधित संचालकाला नोटिस, सूचना बजावूनही कर जमा न केल्याने अखेर मालमत्ता कर वसुली पथकाने भोजनालयाला कुलूप लावण्याची कारवाई केली. जप्ती पथक प्रमुख नरेंद्र घनबहाद्दूर, विनोद कोरपे, प्रकाश कपले, सुरक्षा रक्षक अजहरुद्दीन आदी कर्मचार्यांनी कारवाई पार पाडली.