संघ समजून घ्यायचा तर, सर्वजण आपले हा भाव महत्वाचा; सरसंघचालकांचे अकोल्यात उद्बोधन

By नितिन गव्हाळे | Published: August 6, 2024 08:38 PM2024-08-06T20:38:37+5:302024-08-06T20:38:53+5:30

संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक यशवंत उपाख्य श्याम देशपांडे यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

To understand the rss this sense of belonging is important Sarsanghchalak Mohan Bhagwats address in Akola | संघ समजून घ्यायचा तर, सर्वजण आपले हा भाव महत्वाचा; सरसंघचालकांचे अकोल्यात उद्बोधन

संघ समजून घ्यायचा तर, सर्वजण आपले हा भाव महत्वाचा; सरसंघचालकांचे अकोल्यात उद्बोधन

नितीन गव्हाळे, अकोला 

अकोला: अनेकजण संघात गेल्यास काय मिळते, असा प्रश्न करतात. संघात गेल्यास काही मिळत नाही. मिळतो फक्त आपलेपणा. संघ समजून घ्यायचा असेल तर सर्वजण आपले आहेत हा भाव महत्त्वाचा आहे. काहींमध्ये क्वचित दोषही असतीलही, तरी त्याला आपलेपणाच्या भावाने जपले पाहिजे. आपलेपण, सर्वजण आपले आहेत. हा भाव संघाच्या कार्यपद्धतीत सहज वृद्धींगत होतो. अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मंगळवारी अकोल्यात स्वयंसेवकांना उद्बोधन केले.
अकोल्यातील उत्सव मंगल कार्यालयात मंगळवार ६ ऑगस्ट रोजी आयोजित संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक यशवंत उपाख्य श्याम देशपांडे यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला रा. स्व. संघाचे प्रांतसंघचालक दीपक तामशेट्टीवार उपस्थित होते.

सरसंघचालक डॉ. भागवत म्हणाले की, संघाचा आत्मा स्वयंसेवकच आहे. हिंदू धर्म, संस्कृती रक्षण आणि संवर्धनासाठी स्वयंसेवक कार्यरत आहेत. संघाचे काम करीत असताना अनेक बाबी त्याला शिकायला मिळतात. सोबतच अनेक ठिकाणी त्याचा आपलेपणाच्या भावनेतून ऋणानुबंध जुळतो. हा भाव आणि जुळलेला ऋणानुबंध हीच संघशक्ती आहे. यासोबतच त्यांनी संपूर्ण विश्वाला दहशतवादासोबतच अनेक समस्या भेडसावत आहेत. अशा परिस्थितीत संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितल्याप्रमाणे सर्व जिवांचे मैत्र कायम जपणे हा संघाचा सिद्धांत मूर्त रूपाने प्रकट झाला आहे व तेच आपले ध्येय आहे. परस्परांशी असलेले ऋणानुबंध आपणा सर्वांना जपायचे आहेत. स्वयंसेवक संघाचे काम करीत असताना आपलेपणा जपत असतो. संघकार्य करताना त्याला अनेक ठिकाणी आपलेपणाचा जो अनुभव येतो. आपण जेथे आहोत तेथे आपलेपणा, जिव्हाळा निर्माण व्हावा असे वातावरण असावे असेही सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले. यावेळी सत्कारमूर्ती श्याम देशपांडे यांनीही मनोगत व्यक्त केेले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, आभार कुलदीप देशपांडे यांनी मानले. संचालन सुरेखा शास्त्री, प्रणिता आमले यांनी केले.
फोटो: डॉ. मोहन भागवत नावाने
 

आदर्श गोसेवा व डॉ. हेडगेवार रक्तपेढीला आर्थिक मदत
कार्यक्रमात आदर्श गोसेेवा प्रकल्प आणि डॉ. हेडगेवार रक्त केंद्राला धनादेश देण्यात आला. यावेळी अनिरुद्ध देशपांडे यांनी शास्त्रीय गायन केले तर श्रीनाथ शक्तीपीठाचे आचार्य श्रीकांत गदाधर आणि त्यांच्या चमूने वेदमंत्रांचे पठण केले. कार्यक्रमाला अनेक ज्येष्ठ प्रचारकांसह संघ परिवारातील नागरिक उपस्थित होते.

Web Title: To understand the rss this sense of belonging is important Sarsanghchalak Mohan Bhagwats address in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.