तंबाखूमुक्त अभियान : अकोला जिल्ह्यातील ९९५ शाळा परिसराची पोलिसांकडून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 03:30 PM2018-02-27T15:30:46+5:302018-02-27T15:30:46+5:30
अकोला - शैक्षणिक संस्थांचा परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यात १५ दिवस मोहीम राबविली असून, पोलिसांनी तब्बल ९९५ शाळा, महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थांमध्ये जनजागृती केली.
अकोला - शैक्षणिक संस्थांचा परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यात १५ दिवस मोहीम राबविली असून, पोलिसांनी तब्बल ९९५ शाळा, महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थांमध्ये जनजागृती केली. तसेच १०० मीटर परिसरातील दुकानांमधून तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाºया २२९ दुकानदार व पानटपरीचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली.
संपूर्ण शैक्षणिक संस्थेचा परिसर तंबाखूमुक्त करण्याचे महत्त्वाकांक्षी अभियान राज्यात राबवल्या जात आहे. या अभियानाची काटेकोर अंमलबजावणी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर व अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. तंबाखूजन्य पदार्थ विरोधी कायदा (कोटपा)ची माहिती देण्यासाठी १० ते २४ फेब्रुवारीपर्यंत जिल्हाभर विशेष मोहीम राबवण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेजचा परिसर तंबाखूमुक्त करण्याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालयांना भेटी देण्यात आल्या. संस्था परिसरात धूम्रपान निषेध बोर्ड लावणेबाबत सूचित करण्यात आले. त्यानंतरही परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यात आली, तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशित करण्यात आले. १५ दिवसांत पोलिसांकडून ९९५ शाळा, कॉलेजांना भेटी देऊन विद्यार्थांच्या जीवनावर तंबाखूचा परिणाम होऊ नये, यासाठी दक्षता बाळगण्याच्या सूचना दिल्या. तसेच विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधून त्यांना कोटपा कायद्याची माहिती देण्यात आली. पास्को कायदा, सोशल मीडियाचा योग्य वापर, वाहतुकीचे नियम पालन, येणारी पोलीस भरती, स्पर्धा परीक्षेची माहिती देण्यात आली व विद्यार्थांमधून १५१ नवीन पोलीस मित्रांची नोंदणी करण्यात आली.
या पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रभावी मोहीम
शहरातील सिटी कोतवाली, सिव्हिल लाइन्स, खदान, अकोट ग्रामीण, अकोट फैल व एमआयडीसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रभावीपणे मोहीम राबवण्यात आली. या परिसरात तंबाखूमुक्त अभियान ताकदीने राबविण्यात आले.