आज रामनवमी : विधीवत होणार पूजन; भाविकांसाठी मोठे रामद्वार बंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 08:53 AM2020-04-02T08:53:15+5:302020-04-02T08:53:35+5:30
शतकोत्तर परंपरा लाभलेल्या या मंदिराचे द्वार पहिल्यांदाच रामनवमीला भाविकांसाठी बंद राहणार आहे.
- नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: अकोलेकरांचे आराध्य दैवत श्रीराजराजेश्वर मंदिराएवढीच महती अकोल्यातील मोठे राम मंदिराला आहे. संत गजानन महाराजांच्या कृपाशीवार्दाने मंदिराची स्थापना झाली असून, विदर्भातील रामभक्तांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. शतकोत्तर परंपरा लाभलेल्या या मंदिराचे द्वार पहिल्यांदाच रामनवमीला भाविकांसाठी बंद राहणार आहे; मात्र मंदिर संस्थानचे पदाधिकारी यांच्या उपस्थित शासनाने दिलेले निर्देश व सूचनांचे पालन करून विधिवत पूजा होणार आहे.
मोर्णा नदीच्या तीरावर शहर कोतवाली पोलीस ठाण्यासमोर टिळक मार्गावर मोठे राम मंदिर आहे. शंभर वर्षांपेक्षा अधिक परंपरा लाभलेल्या या मंदिराचे बांधकाम प्राचीन आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात राम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांच्या आकर्षक मूर्ती आहेत. अलीकडे प्रवेश द्वाराजवळ संत गजानन महाराजांचे मंदिर साकारले आहे. संत गजानन महाराज ज्या शिळेवर बसले होते, ती शिळा येथे आहे.
वर्षभर धार्मिक उत्सव
मंदिराचा कारभार हरिहर रामचंद्र संस्थानच्या अध्यक्ष सुमन अग्रवाल पाहतात. मंदिरात वर्षभर विविध धार्मिक उत्सवाचे आयोजन होते. यामध्ये प्रामुख्याने रामनवमी, जन्माष्टमी, हनुमान जयंती सोहळे असतात. रामनवमी शोभायात्राची राज्यात वेगळी ओळख बनली आहे; मात्र यंदा कोरोना विषाणूच्या सावटामुळे चैत्र पाडवा, रामनवमी, हनुमान जयंती महोत्सव फक्त धार्मिक विधी करून साजरा करण्यात येत आहे.
अशी झाली मंदिराची उभारणी
संत गजानन महाराज एका सभेसाठी अकोल्यात आले होते. राजेश्वर मंदिरासमोरील पटांगणात महाराजांची सभा होती. कार्यक्रमानंतर (कै.) बच्चुलाल अग्रवाल यांनी महाराजांना घरी येण्याचा आग्रह धरला. त्यांनी महाराजांना घरी आल्यावर प्रशस्त आसन, दागदागिने, उची वस्त्रे भेट दिली. गजानन महाराजांनी ते सर्व नाकारत एका शिळेवर आसनस्थ झाले. यावेळी बच्चुलाल अग्रवालांनी आपल्याला मुलबाळ नसल्याची खंत व्यक्त केली. त्यावेळी संत गजानन महाराजांनी राम मंदिराची स्थापना करण्याची आज्ञा केली. मंदिरासाठी जागेकडेही महाराजांनीच निर्देश केले. तेच हे आजचे मोठे राम मंदिर.
राम जन्मोत्सव दुपारी
गुरुवार, २ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता धार्मिक रितीने पूजा-अर्चना व आरती करण्यात येणार आहे, तसेच चैत्रपाडवा ते रामनवमी आणि रामनवमी ते हनुमान जयंती,असे दरवर्षी प्रमाणे आयोजित धार्मिक कार्यक्रम विधिवत होत आहेत. फक्त जेथे गर्दी होईल,असे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती मंदिर संस्थानने दिली.