आजपासून लालपरी रस्त्यावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 06:00 AM2020-08-20T06:00:00+5:302020-08-20T06:00:07+5:30
कोविड-१९ प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून अकोला येथून गुरुवार, २० आॅगस्टपासून ‘लालपरी’ रस्त्यावर धावताना दिसणार आहे.
अकोला : कोरोना महामारीच्या पृष्ठभूमीवर गत चार महिन्यांपासून ठप्प असलेली राज्य परिवहन महामंडळाची (एसटी)आंतरजिल्हा बससेवा सुरु करण्यास राज्य सरकारने परवाणगी दिली असून, याअनुषंगाने एसटीच्याअकोला विभागाने सर्व प्रमुख मार्गांवर गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. कोविड-१९ प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून अकोला येथून गुरुवार, २० आॅगस्टपासून ‘लालपरी’ रस्त्यावर धावताना दिसणार आहे.
प्रवाशी वाहतूक एकदम पूर्ववत होणार नसली तरी प्रवाशांचा प्रतिसाद विचारात घेवून बसगाड्यांचे शेड्यूल ठरविण्यात येणार आहे. प्रवाशी मर्यादा निश्चित करण्यात आल्याने तुर्तास निम्म्या प्रवाशांवरच ही वाहतूक होणार असल्याचे विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
अकोला येथून लगतच्या जिल्ह्यांच्या ठिकाणी बसेस सोडण्यात येणार आहेत. जिल्हांतर्गत प्रवासी वाहतुकही सुरु होणार असून, प्रवाशांचा कसा प्रतिसाद मिळतो यानुसार बस सोडण्यात येणार आहेत. तूर्तास तालुक्यांच्या ठिकाणीच बसेस धावणार असून, हळूहळू प्रवाशांच्या भारमानाचा अंदाज घेऊन बससेवा विस्तारीत करण्यात येणार आहे. फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क परिधान करणे आदी नियमांच्या अधिन राहून प्रवाशांना एसटी बसमधून प्रवास करता येणार आहे.
वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक!
एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी कोविड-१९ च्या नियमांचे पालन करणे आवश्यक राहणार आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व खबरदारी घेण्यात येणार असून, प्रवास करणाऱ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे. ई-पासची मात्र कोणतीही गरज नसल्याचे विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर यांनी सांगितले.
आंतरजिल्हा प्रवासी वाहतुक सुरु करण्यात येणार असून, सर्व प्रमुख मार्गांवर बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. राज्य सरकाने निश्चित केलेल्या नियमानूसार एकूण क्षमतेच्या निम्म्या प्रवाशांना कोविड-१९ नियमांचे पालन करून बससेवा सुरु करण्यात येणार आहे. - चेतना खिरवाडकर, विभाग नियंत्रक, अकोला