मराठी भाषेच्या इतिहासातील आजचा दिवस ऐतिहासिक, पश्चिम वऱ्हाडातील साहित्यिकांनी व्यक्त केले समाधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 12:12 AM2024-10-04T00:12:44+5:302024-10-04T00:12:56+5:30
Akola News: केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी करण्यात येत होती. केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय जाहीर केला. हा दिवस मराठी भाषेच्या इतिसाहातील ऐतिसाहिक दिवस असल्याच्या प्रतिक्रिया पश्चिम वऱ्हाडातील साहित्यिकांनी दिली आहे.
अकोला - केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी करण्यात येत होती. केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय जाहीर केला. हा दिवस मराठी भाषेच्या इतिसाहातील ऐतिसाहिक दिवस असल्याच्या प्रतिक्रिया पश्चिम वऱ्हाडातील साहित्यिकांनी दिली आहे.
या दर्जासाठी प्रदीर्घ काळ लढा सुरू होता. मुळात मराठी भाषेतील साहित्यही अभिजात आहे. आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही स्वागतार्ह बाब आहे. मराठी लेखक म्हणून मनस्वी आनंद असून, यामुळे साहित्य निर्मितीलाही बळ मिळेल.
-सदानंद देशमुख, बारोमासकार, बुलढाणा
या दर्जामुळे मराठी भाषा ही प्राचीन असल्याचे स्पष्ट झाले. रंगनाथ पठारे समितीने सबळ पुरावे दिले. त्यामुळे अभिजात भाषेचा मिळालेला दर्जा आम्हा सारस्वतांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. आता मराठीच्या विकासासाठी केंद्राच्या निधीचा मार्ग खुला झाला आहे. मराठीचा विस्तार हा समुद्रापेक्षाही मोठा आहे. ज्या भाषेत लिहितो, बोलतोय तिला हा दर्जा मिळाल्याने मराठीचे आसमंत आनंदाने चिंब झाले आहे.
- अजिम नवाज राही, कवी, निवेदक, लेखक, बुलढाणा
आज केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केला. ही आनंदाची बाब आहे. मराठी भाषेचे अधिक संशोधन होईल, मराठी भाषा विकसित होईल, मराठी भाषा ही ज्ञानभाषा, व्यवहार भाषा म्हणून सर्वत्र वापरली जाईल. प्राचीन ग्रंथाचे अनुवाद होतील.
- बाबाराव मुसळे, ज्येष्ठ साहित्यिक, वाशिम
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून मराठी भाषिक, मराठी प्रेमी व मराठी साहित्यिक केंद्र सरकारकडे सातत्याने मागणी करीत होते. परंतु, ती मागणी आजवर मान्य होत नव्हती. आता मात्र मराठी जनांची ती मागणी मान्य केल्याचा गोड धक्का केंद्र सरकारने दिला. त्यामुळे मी व्यक्तिश: माझ्या वतीने व मराठी जनांच्या वतीने केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तथा सांस्कृतिक मंत्री महोदयांचे अत्यंत आभारी आहोत.
- पद्मश्री ना. चं. कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक, वाशिम
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दर्जा मिळावा, ही खूप दिवसांपासून अपेक्षा होती. ती आता पूर्ण झाल्याने आनंद झाला. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने, मराठी माणसांत चैतन्य येईल.
- प्रा. डाॅ. विठ्ठल वाघ, सुप्रसिद्ध वऱ्हाडी कवी, अकोला
सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, ही अभिनंदनीय बाब आहे. अभिजात भाषेचा दर्जा टिकवून ठेवणे, त्यासाठी योग्य ते लेखन करण्यासाठी प्रयत्न करणे आणि आपण सर्व मराठी भाषेचे सेवक आहोत, यात एकजूट असणे गरजेचे आहे.
- नारायण कुळकर्णी-कवठेकर, सुप्रसिद्ध कवी, अकोला