आज महापौर पदाची निवडणूक
By admin | Published: March 9, 2017 03:37 AM2017-03-09T03:37:53+5:302017-03-09T03:37:53+5:30
भाजपचे विजय अग्रवाल, काँग्रेसच्यावतीने शेख नौशाद यांची उमेदवारी.
अकोला, दि. ८- महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर उद्या गुरुवारी सकाळी ११ वाजता मनपाच्या मुख्य सभागृहात महापौर, उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. महापौर पदासाठी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विजय अग्रवाल, काँग्रेसच्यावतीने शेख मोहम्मद नौशाद तसेच उपमहापौर पदासाठी भाजपच्यावतीने वैशाली विलास शेळके यांनी तर शिवसेनेच्यावतीने राजेश मिश्रा यांनी उमेदवारी दाखल केली आहे.
महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीत २0 प्रभागांतील ८0 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. ८0 जागांपैकी तब्बल ४८ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. अपक्ष नगरसेविका माधुरी मेश्राम यांनी भाजपला पसंती दिल्याने भाजपचे संख्याबळ ४९ झाले आहे. निवडणूक आटोपल्यानंतर महापौर, उपमहापौर पदाच्या निवड प्रक्रियेसाठी ९ मार्च रोजी मनपाच्या मुख्य सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ३ मार्च रोजी उमेदवारी अर्जांचे वाटप केल्यानंतर ४ मार्च रोजी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. भाजपच्यावतीने महापौर पदासाठी ज्येष्ठ नगरसेवक विजय अग्रवाल तसेच उपमहापौर पदासाठी वैशाली शेळके यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
महापौर पदासाठी काँग्रेसकडून शेख मोहम्मद नौशाद यांनी, तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडून राजेश मिश्रा, गजानन चव्हाण तसेच काँग्रेसच्या सुवर्णरेखा जाधव यांची उमेदवारी कायम आहे. उद्या सकाळी मनपाच्या मुख्य सभागृहात सकाळी ११ वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल. सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष
महापौर पदासाठी काँग्रेसच्यावतीने शेख मोहम्मद नौशाद यांनी उमेदवारी दाखल केली. काँग्रेसचे संख्याबळ १३ असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ पाच आहे. एमआयएमचा एक उमेदवार निवडून आला. महापौर पदासाठी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकाने सादर केलेली उमेदवारी पाहता राष्ट्रवादी व एमआयएम काँग्रेसला साथ देईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नगरसेवकांना ओळखपत्र आवश्यक
मनपाच्या मुख्य सभागृहात सकाळी ११ वाजता महापौर, उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया होईल. यावेळी नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांनी त्यांचे छायाचित्र असलेले ओळखपत्र सोबत आणण्याचे निर्देश सभेचे पिठासीन अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.