स्थायी समिती सदस्य निवडीसाठी आज मनपाची सभा
By admin | Published: February 29, 2016 02:32 AM2016-02-29T02:32:01+5:302016-02-29T02:32:01+5:30
नवीन सदस्यांबाबत उत्स्कूता; अकोला मनपाची सभा ठरणार वादळी.
अकोला: महापालिकेत स्थायी समितीचे नवीन आठ सदस्य निवडण्यासाठी सोमवार, २९ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजता सभा आयोजित करण्यात आली.
महापालिकेत २0१३ पासून स्थायी समितीच्या सदस्य निवडीवर सतत वाद झाले. मनपात सत्तापरिवर्तन होऊन भाजप-शिवसेना युतीची सत्ता आल्यानंतर स्थायी समितीचे पुनर्गठन होईल ही अपेक्षा होती. महापौर उज्ज्वला देशमुख यांनी फेब्रुवारी २0१४ मध्ये स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड केली असता, महापौरांनी मंजूर केलेल्या निवड प्रक्रियेवर काही नगरसेवकांनी आक्षेप नोंदवत नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्या. यामुळे आजपर्यंत स्थायी समितीचे पुनर्गठन रखडले आहे. अशा स्थितीत नियमानुसार आठ सदस्यांचा कालावधी मार्च २0१६ मध्ये संपुष्टात येणार असल्याने त्यांच्या जागी नवीन आठ सदस्यांची निवड प्रक्रिया प्रशासनाला पूर्ण करावी लागणार आहे.
स्थायी समितीच्या सोळा सदस्यीय समितीमधून दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेले आठ सदस्य समितीच्या बाहेर होतील. यामध्ये भाजपचे बाळ टाले, सतीश ढगे, शिवसेनेच्या योगीता पावसाळे, अपक्ष मंगला म्हैसने, काँग्रेसचे मदन भरगड, कोकिळा डाबेराव, राष्ट्रवादीच्या शमशाद बेगम शेख फरीद, भारिपच्या धनश्री देव यांचा समावेश आहे. या आठ सदस्यांच्या बदल्यात नवीन कोणत्या आठ सदस्यांचा समावेश होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेकडून राजकुमारी मिश्रा यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.