आज शाळा प्रवेशोत्सव
By admin | Published: June 26, 2015 01:51 AM2015-06-26T01:51:31+5:302015-06-26T01:51:31+5:30
३ लाख ५७ हजार ३९३ विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षक सज्ज.
अकोला : विदर्भातील शाळांची घंटा शुक्रवार २६ जून रोजी वाजणार असून ९२२ शाळांमध्ये ३ लाख ५७ हजार ३९३ विद्यार्थी शाळा प्रवेश करणार आहेत. त्या अनुषंगाने शिक्षण विभागातर्फे शाळा प्रवेशोत्सवाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. शाळा प्रवेशोत्सवाच्या वेळी गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे; परंतु दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक शाळांच्या पटांगणात पाणी साचल्याने चिखल आणि गवतामुळे अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे शाळा प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अस्वच्छतेतच बसावे लागणार असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. अमरावती विभागातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा शुक्रवारी सुरू होणार आहेत. त्या अनुषंगाने शिक्षण विभागातर्फे मोठय़ा प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आनंददायी वातावरण निर्मिती व्हावी या अनुषंगाने प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येणार आहे. तसेच शाळेचा पहिला दिवस म्हणून शाळेमध्ये साफसफाई, शाळेच्या पटांगणात स्वच्छता आणि रांगोळी घालून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात यावे, असे आदेश शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्वच शाळांना दिले आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी झालेल्या स्वागतामुळे आणि प्रसन्न वातावरणामुळे विद्यार्थ्यांची शाळेबाबतची गोडी वाढणार असून, उपस्थिती वाढीस मदत होणार आहे. एककडे शिक्षण विभागाची शाळाप्रवेशाबाबत जोरात तयारी सुरू आहे तर दुसरी कडे मात्र, पावसामुळे शाळांच्या पटांगणाची दुरवस्था झालेली आहे. गत काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शाळांच्या पटांगणात डबके साचले आहेत. यातील बहुतांश डबके कोरडे झाले असले तरी, सुकलेले चिखल आणि गवत वाढले आहे. तसेच परिसरात मोठय़ा प्रमाणात कचर्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे शाळा प्रवेशोत्सवात विद्यार्थ्यांंना बसण्यासाठीदेखील योग्य जागा उपलब्ध होऊ शकणार नाही.