शौचालयाची गैरसोय, पत्नी गेली माहेरी ! गटविकास अधिकाऱ्यांकडे पतीने मांडली कैफियत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 06:26 IST2025-02-25T06:26:11+5:302025-02-25T06:26:17+5:30
शौचालयाचा वापर करणे अशक्य झाले असून, कुटुंबातील सदस्यांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे.

शौचालयाची गैरसोय, पत्नी गेली माहेरी ! गटविकास अधिकाऱ्यांकडे पतीने मांडली कैफियत
- राहुल सोनोने
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडेगाव (जि. अकोला) : घराशेजारील नालीचे बांधकाम अपूर्ण असल्यामुळे सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागत नाही. परिणामी, शौचालयाचा वापर करणे अशक्य झाले असून, कुटुंबातील सदस्यांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे. या त्रासाला कंटाळून पत्नी माहेरी निघून गेल्याची तक्रार दिग्रस येथील विकास तायडे यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे सोमवारी केली आहे.
नालीचे सांडपाणी घरासमोर साचल्याने आरोग्य धोक्यात
तक्रारीनुसार, पातूर तालुक्यातील दिग्रस बु. ग्रामपंचायतीच्या वाॅर्ड क्रमांक एकमध्ये नालीचे बांधकाम करण्यात आले. मात्र, त्या नालीतून सांडपाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक वाट तयार करण्यात आलेली नाही.
परिणामी, नालीतील सांडपाणी घरासमोर साचत असून, चिमुकल्यांसह कुटुंबाचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच शौचालयाचा वापर करता येत नसल्याने संपूर्ण कुटुंबास उघड्यावर शौचास जावे लागत आहे. या समस्येमुळे पत्नी माहेरी निघून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
नालीच्या बांधकामासंदर्भात संबंधित मिस्त्रींना सूचना देण्यात आल्या असून, लवकरच काम सुरू करण्यात येईल.
आशा सुधाकर कराळे, सरपंच, दिग्रस बु.
ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांना मागील चार महिन्यांपासून तोंडी तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. नालीचे बांधकाम न झाल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागेल.
विकास तायडे, ग्रामस्थ, दिग्रस बु.