बाजार समितीचे टोकन बुक संशयास्पद
By admin | Published: March 19, 2017 07:51 PM2017-03-19T19:51:48+5:302017-03-19T19:51:48+5:30
तेल्हारामधील नाफेडची तूर खरेदी सुरुवातीपासूनच वादाच्या भोवºयात सापडली आहे.
नाफेड तूर खरेदी प्रकरण : नाफेड रजिस्टरमध्ये नोंद नाही
तेल्हारा: तेल्हारामधील नाफेडची तूर खरेदी सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना त्रास देऊन व्यापाऱ्यांचा माल मोजण्याचे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. आता तर चक्क टोकन बुकच संशयास्पद असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
गेल्या दीड महिन्यापासून बाजार समिती यार्डात सुरू असलेली नाफेडची तूर खरेदी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शेतकऱ्यांच्या मालाची नासाडी होत आहे. डुकराच्या त्रासाबरोबरच किरकोळ चोरीचे प्रकारसुद्धा येथे घडले. बाजार समितीच्या यार्डात असलेल्या मालाची देखरेख करणे, बाजार समितीचे काम असले तरी बाजार समिती प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचे दिसते. या केंद्रावर शेतकऱ्यांच्या मालापेक्षा व्यापारी, दलालाच्या मालाचे मोजमाप त्वरित होते.
नाफेडमध्ये तूर खरेदीस आणताना कृषी उत्पन्न बाजार समिती प्रवेश पत्रिका भरून घेते. यामध्ये शेतकऱ्यांचे नाव, गाव, धान्याचा प्रकार, वजन, गाडी नंबर, फॅक्टरीचे नाव, गट नंबर, दाखला, दिनांकासह माहिती भरली जाते. याबाबतची नोंद नाफेडच्या रजिस्टरमध्ये असणे गरजेचे आहे; परंतु या ठिकाणी बाजार समितीमधील आवक-जावक रजिस्टरमध्ये नोंद आहे; परंतु नाफेड रजिस्टरमध्ये नोंद नसलेल्या शासकीय खरेदी प्रवेश पत्रिका टोकन नं. ०६४, ०६५ या संशयास्पद असल्याचे दिसते. सदर पावत्यावरसुद्धा धान्य मार्केटमधील आवक रजिस्टरमध्ये नोंद झालेली आहे असे वरून लिहिलेले आहे. सदर पावत्यांची नाफेडच्या रजिस्टरमध्ये कसलीही नोंद नसतानाही सदर पावतीवरील तुरीचे मोजमाप झालेले आहे. एकंदरीत हा सर्व प्रकार संशयास्पद असून याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)
सदर प्रकार गंभीर असून याबाबत बाजार समितीच्या सभेत मुद्दा उपस्थित करून दोषी असणाऱ्यावर कार्यवाहीची मागणी करू.
- श्यामशील भोपळे
बाजार समिती, तेल्हारा
बाजार समिती गेटवर आवक येत असताना समितीच्या आवक रजिस्टरमध्ये नोंद होते. त्यावरून टोकन रजिस्टर तयार होते. टोकनवरून मोजमाप केले जाते.
- माधव पाथ्रीकर
सचिव, बाजार समिती, तेल्हारा.