नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत उद्या!
By admin | Published: October 4, 2016 02:27 AM2016-10-04T02:27:38+5:302016-10-04T02:27:38+5:30
राजकारणाची समीकरणे बदलणार असून सोडतीकडे अकोला जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
अकोला, दि. ३- नगरपालिकांचे अध्यक्ष थेट जनतेतून निवडून येणार असून, या पदासाठीची आरक्षण सोडत बुधवार, ५ ऑक्टोबरला मुंबई येथे निघणार आहे. नगरविकास मंत्रालयाने तसा आदेश निर्गमित केल्याने सर्वांचे लक्ष या आरक्षणाकडे लागले आहे. इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून, नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग येणार आहे.
जिल्ह्यातील आकोट, बाळापूर, मूर्तिजापूर, पातूर व तेल्हारा या नगरपरिषदेची निवडणूक होत आहे. प्रभाग रचना आणि नगरसेवकांचे आरक्षण गेल्या महिन्यातच घोषित झाले. यंदा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय शासनाने घेतला होता; परंतु नगराध्यक्षांच्या आरक्षणाला विलंब होत होता. अखेर नगरविकास विभागाचे अवर सचिव मिलिंद कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीने १ ऑक्टोबर रोजी आदेश निघाला. या आदेशानुसार राज्यातील नगराध्यक्षांच्या आरक्षणाची सोडत ५ ऑक्टोबर रोजी मुंबई मंत्रालयातील परिषद सभागृहात काढण्यात येणार आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत एका प्रभागात चार वॉर्ड समाविष्ट होते. आता दोन वॉर्ड मिळून एक प्रभाग झाल्यामुळे आणि यावेळी वॉर्डाची, प्रभागाची पुनर्रचना केल्यामुळे बर्याच विद्यमान नगरसेवकांना वॉर्ड बदलावा लागणार आहे. काही वॉर्डात नव्या चेहर्यांना संधीसुद्धा मिळू शकते.
अध्यक्ष पदाच्या यापूर्वी जाहीर झालेल्या आरक्षणात बदल होईल व तेसुद्धा थेट जनतेतून असल्याने जनता जनार्दन कुणाच्या बाजूने कौल देणार, ते येणारा काळच दाखवून देणार आहे; मात्र यासाठी अनेक नवरदेव पडद्यामागे बाशिंग बांधून तयारीत आहेत, हे विशेष.