कल चाचणीची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात!
By admin | Published: December 31, 2015 02:37 AM2015-12-31T02:37:46+5:302015-12-31T02:37:46+5:30
अकोला, यवतमाळ जिल्हा पिछाडीवर; विद्यार्थ्यांंसाठी लवकरच हेल्पलाइन.
अकोला : फेब्रुवारी २0१६ मध्ये होऊ घातलेल्या कल चाचणीची पूर्वतयारी म्हणून शाळेतील संगणकांवर ऑनलाइन प्रणाली कार्यान्वित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. विभागातील अकोला, यवतमाळ हे जिल्हे पिछाडीवर असून, इतर जिल्ह्यांची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांंची फेब्रुवारी- २0१६ मध्ये ऑनलाइन कल चाचणी घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने माहिती व तंत्रज्ञान (आयटीसी) विषयतज्ज्ञ शिक्षकांमार्फत जिल्ह्यातील शाळांमध्ये संगणक सुविधांचे ९ ते २३ डिसेंबर या कालावधीत सर्वेक्षण करण्यात आले. संगणक सर्वेक्षणानंतर कल चाचणी पूर्वतयारीच्या दुसर्या टप्प्यात ३0 डिसेंबरपर्यंंत शाळांना कल चाचणीच्या संकेतस्थळावरून शिक्षण मंडळातर्फे देण्यात आलेली संगणक प्रणाली अद्ययावत करणे आवश्यक होते. त्या अनुषंगाने अमरावती विभागातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक कामाला लागले होते. आतापर्यंंत विभागातील अमरावती, वाशिम, बुलडाणा या जिल्ह्यातील बहुतांश शाळांनी कल चाचणीची संगणक प्रणाली अद्ययावत केली असून, अकोला आणि यवतमाळ हे जिल्हे पिछाडीवर असल्याचे समजते. कल चाचणीची ही पूर्वतयारी येत्या आठ ते दहा दिवसांत पूर्ण करण्याचे आवाहन विभागीय शिक्षण संचालकांनी केले आहे.