तूर खरेदी बंद ; अकोला जिल्ह्यात ३२ हजारावर शेतकऱ्यांचा जीव टांगणीला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 01:33 PM2018-05-17T13:33:15+5:302018-05-17T13:33:15+5:30
अकोला : ‘नाफेड’ मार्फत जिल्ह्यातील तूर खरेदी मंगळवारपासून बंद करण्यात आली आहे. तूर खरेदीस अद्याप मुदतवाढ मिळाली नसल्याने, आॅनलाइन नोंदणी केलेल्या ३२ हजार १४६ शेतकऱ्यांच्या तूर खरेदीची प्रक्रिया रखडली आहे.
अकोला : ‘नाफेड’ मार्फत जिल्ह्यातील तूर खरेदी मंगळवारपासून बंद करण्यात आली आहे. तूर खरेदीस अद्याप मुदतवाढ मिळाली नसल्याने, आॅनलाइन नोंदणी केलेल्या ३२ हजार १४६ शेतकऱ्यांच्या तूर खरेदीची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे तूर खरेदी केव्हा सुरू होणार, या प्रतीक्षेत जिल्ह्यातील शेतकºयांचा जीव टांगणीला लागला आहे.
नाफेडमार्फत जिल्ह्यातील अकोला, तेल्हारा, पातूर, अकोट, बार्शीटाकळी, वाडेगाव, पारस व मूर्तिजापूर इत्यादी आठ केंद्रांवर गत २ फेबु्रवारीपासून तूर खरेदी सुरू करण्यात आली होती. तूर खरेदीसाठी जिल्ह्यातील ४५ हजार ९५५ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली; परंतु खरेदी करण्यात आलेली तूर साठविण्यासाठी वखार महामंडळाच्या जिल्ह्यातील गोदामांमध्ये जागा उपलब्ध नसल्याचे सांगून, तूर खरेदी संथगतीने करण्यात आली व वारंवार खरेदी खंडित करण्यात आली. नाफेडमार्फत तूर खरेदीची मुदत १५ मे रोजी सायंकाळी संपुष्टात आल्याने, जिल्ह्यात तूर खरेदी बंद करण्यात आली. आॅनलाइन नोंदणी केलेल्या ४५ हजार ९५५ तूर उत्पादक शेतकऱ्यांपैकी १५ मेपर्यंत केवळ १३ हजार ८०९ शेतकºयांची तूर खरेदी करण्यात आली असून, उर्वरित ३२ हजार १४६ शेतकºयांची तूर खरेदीची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. तूर खरेदी बंद करण्यात आली असून, खरेदीसाठी अद्याप मुदतवाढ मिळाली नाही, तसेच सरकारमार्फत तूर खरेदीसंदर्भात अद्याप कोणताही आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला नाही. त्यामुळे तूर खरेदी केव्हा सुरू होणार, याबाबत आॅनलाइन नोंदणी केलेल्या मात्र तूर खरेदी रखडलेल्या जिल्ह्यातील ३२ हजार १४६ शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
जिल्ह्यातील तूर खरेदीवर एक दृष्टिक्षेप!
-आॅनलाइन नोंदणी केलेले शेतकरी : ४५९५५
-तूर खरेदी करण्यात आलेले शेतकरी : १३८०९
-तूर खरेदीच्या प्रतीक्षेत शेतकरी : ३२१४६
-खरेदी करण्यात आलेली तूर : २ लाख ६हजार ३९१ क्विंटल.
-बाकी असलेली तूर खरेदी : २ लाख क्विंटल.
जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविला मुदतवाढीचा प्रस्ताव !
जिल्ह्यात दोन लाख क्विंटल तूर खरेदीची प्रक्रिया बाकी आहे. त्यानुषंगाने तूर खरेदीसाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव बुधवारी शासनाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.