अकोला जिल्ह्यात तूर खरेदीचे दीड महिन्यापासून अडकले चुकारे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 03:36 PM2018-04-21T15:36:42+5:302018-04-21T15:36:42+5:30
अकोला : ‘नाफेड’मार्फत जिल्ह्यात गत दीड महिन्यात खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे अद्याप करण्यात आले नाही.
अकोला : ‘नाफेड’मार्फत जिल्ह्यात गत दीड महिन्यात खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे अद्याप करण्यात आले नाही. दीड महिन्यांपासून चुकारे अडकल्याने, विकलेल्या तुरीचे हक्काचे पैसे केव्हा मिळणार, याबाबत तूर उत्पादक शेतकºयांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ‘नाफेड’मार्फत ५ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल दराने जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, पिंजर, पातूर, वाडेगाव व पारस इत्यादी सात केंद्रांवर गत २ फेबु्रवारीपासून तूर खरेदी सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील सात खरेदी केंद्रांवर १८ एप्रिलपर्यंत ५५ कोटी ९० लाख रुपयांची १ लाख २ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. त्यापैकी गत ३ मार्चपर्यंत खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे ३० कोटी रुपयांचे चुकारे गत ३१ मार्च रोजी महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनमार्फत करण्यात आले; परंतु गत ४ मार्च ते १८ एप्रिलपर्यंत या दीड महिन्याच्या कालावधीत ‘नाफेड’मार्फत जिल्ह्यात खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे २६ कोटी रुपयांचे चुकारे अद्याप करण्यात आले नाही. तूर खरेदीचे चुकारे दीड महिन्यापासून रखडल्याने लग्नसराई आणि शेती मशागतीच्या काळात विकलेल्या तुरीचे हक्काचे पैसे मिळणार तरी केव्हा, याबाबत तूर उत्पादक शेतकºयांकडून प्रतीक्षा केली केली जात आहे.
खरेदी बंदच; ४० हजार शेतकरी तूर मोजमापाच्या प्रतीक्षेत!
‘नाफेड’च्या आदेशानुसार जिल्ह्यातील सातही खरेदी केंद्रांवर गत १८ एप्रिलपासून तूर खरेदी बंद करण्यात आली. खरेदी अद्याप बंदच असल्याने तूर खरेदीसाठी ‘आॅनलाइन’ नोंदणी केल्यानंतर जिल्ह्यात ४० हजार शेतकºयांच्या तुरीचे मोजमाप रखडले आहे. त्यामुळे खरेदी केव्हा सुरू होणार आणि नोंदणी केलेल्या तुरीचे मोजमाप केव्हा होणार, याबाबत तूर उत्पादक शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
‘नाफेड’मार्फत जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर १८ एप्रिलपर्यंत ५५ कोटी ९० लाख रुपयांची १ लाख २ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. त्यापैकी गत ३ मार्चपर्यंत खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे करण्यात आले असून, ४ मार्च ते १८ एप्रिलपर्यंत खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे होणे अद्याप बाकी आहे.
-राजेश तराळे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी.