अकोला जिल्ह्यात धुवाधार पाऊस; तीन तालुक्यांत अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:04 PM2019-09-22T12:04:59+5:302019-09-22T12:09:38+5:30
जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, जिल्ह्यातील विविध भागात खरीप पिके पाण्याखाली गेली आहेत.
अकोला : जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी पहाटेपर्यंत सार्वत्रिक धुवाधार पाऊस बरसला असून, बार्शीटाकळी, तेल्हारा व पातूर या तीन तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, जिल्ह्यातील विविध भागात खरीप पिके पाण्याखाली गेली आहेत. पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
जिल्ह्यातील सातही तालुक्यांत शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी पहाटेपर्यंत जोरदार पाऊस बरसला. शनिवारी दुपारीही पावसाने हजेरी लावली. २१ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ५३.३ मिलिमीटर पाऊस झाला असून, त्यामध्ये बार्शीटाकळी, तेल्हारा व पातूर या तीन तालुक्यांमध्ये ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याने, या तीनही तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. धुवाधार पाऊस बरसल्याने जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला असून, शेतातील खरीप पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतात पावसाचे पाणी साचल्याने कपाशी, सोयाबीन व तूर इत्यादी खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाच्या दणक्यात कपाशीची फुले-पात्या व बोंड्या व सोयाबीनच्या शेंगा गळून पडल्या. तसेच तूर पिकाच्या फांद्याही जमिनीवर कोसळल्या. हाताशी आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने, जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
जिल्ह्यात सरासरी ५३.३ मि.मी.पाऊस!
जिल्ह्यात २१ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजतापर्यंत गत २४ तासांत सरासरी ५३.३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. त्यामध्ये अकोला तालुक्यात ३९.२ मि.मी., बार्शीटाकळी तालुक्यात ८२.१ मि.मी., अकोट तालुक्यात ३८.८ मि.मी., तेल्हारा तालुक्यात ७१.३ मि.मी., बाळापूर तालुक्यात ५५.१ मि.मी., पातूर तालुक्यात ७३.४ मि.मी. व मूर्तिजापूर तालुक्यात १३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
पाच तालुक्यांतील १४ महसूल मंडळांत अतिवृष्टी!
जिल्ह्यात पाच तालुक्यांतील १४ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामध्ये अकोला तालुक्यातील सांगळूद महसूल मंडळात ९१.४ मि.मी., बोरगाव मंजू महसूल मंडळात ७२ मि.मी., बार्शीटाकळी तालुक्यातील बार्शीटाकळी महसूल मंडळात ९० मि.मी., महान महसूल मंडळात १६० मि.मी., खेर्डा बु. महसूल मंडळात ११५ मि.मी., तेल्हारा तालुक्यातील तेल्हारा महसूल मंडळात ८७ मि.मी., अडगाव महसूल मंडळात ६७ मि.मी., पाथर्डी महसूल मंडळात ७२ मि.मी., हिवरखेड महसूल मंडळात ६५ मि.मी., पंचगव्हाण महसूल मंडळात ८२ मि.मी., बाळापूर तालुक्यातील निंबा महसूल मंडळात ६८ मि.मी., हातरुण महसूल मंडळात ७६ मि.मी. आणि पातूर तालुक्यातील पातूर महसूल मंडळात ११० मि.मी., बाभूळगाव महसूल मंडळात १६४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
नदी-नाल्याकाठची खरबडून गेली जमीन!
जोरदार पाऊस पडल्याने, नदी-नाल्यांना पूर आला आहे. पुरामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्याकाठची शेतजमीन खरबडून गेली आहे. शेतजमिनीचे नुकसान झाल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. तसेच अतिवृष्टी आणि पावसाचे पाणी शेतांमध्ये साचले असून, पिके पाण्याखाली गेली आहेत.
काटेपूर्णा धरणातील जलसाठा ३३ टक्क्यांवर!
अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या महान येथील काटेपूर्णा धरणातील जलसाठा २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजतापर्यंत ३३. ५३ टक्क्यांवर पोहोचला. तसेच वान धरणात ९६.४९ टक्के, मोर्णा धरणात ४६.१८ टक्के, निर्गुणा धरणात ५९.२७ टक्के, उमा धरणात २९.७९ टक्के व दगडपारवा धरणात १३.७४ टक्के जलसाठा उपलब्ध झाला. पाऊस व पुरामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू असल्याने, धरणांच्या जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.