सोनोरी, बपोरी परिसरात मुसळधार पाऊस; पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:14 AM2021-07-19T04:14:10+5:302021-07-19T04:14:10+5:30
यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हैराण झाला आहे. सुरुवातीच्या काळात पावसाने दडी दिल्याने काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. ...
यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हैराण झाला आहे. सुरुवातीच्या काळात पावसाने दडी दिल्याने काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. कोरोनामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांनी पैशांची जुळवाजुळव करून पेरणी केली. पिके बहरलेले असताना, शनिवारी रात्रीच्या सुमारास परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने शेतात पाणीच पाणी साचले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागात सर्व्हे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत आहे.
----------------------------
‘नुकसानग्रस्त भागात तत्काळ पंचनामा करा!’
मूर्तिजापूर तालुक्यातील सोनोरी, बपोरी परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने शेतात पाणी साचून पिकांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात प्रशासनाने त्वरित पंचनामा करून अहवाल सादर करून, शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा भाजपतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी जि. प.सदस्य मायाताई कावरे यांनी दिला आहे.
-----------------------------------------------------------------
पावसाची जोरदार हजेरी; शेतात साचले पाणीच पाणी
अकोला: गत दोन दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली होती. त्यामुळे नागरिक उकाड्याने त्रस्त झाले होते. रविवारी दुपारनंतर वातावरणात बदल होऊन ढगांची गर्दी झाली. त्यानंतर, दुपारी ३ ते ३.३० वाजताच्या सुमारास तालुक्यातील काही भागांत मुसळधार पाऊस झाला, तर काही भागांत अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अकोला तालुक्यातील आपातापा, आपोती, गोणापूर, दापूर, मजलापूर, अंबिकापूर परिसरात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते, तसेच शेतशिवारात पाणी साचून शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
गोणापूर परिसरात रविवारी दुपारच्या परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. पावसामुळे शेतात पाणी साचून घनश्याम बोडदे, प्रदीप पाटील, तुळशीदास जळमकर, विलास जळमकर, महादेव सोनटक्के, केशव सोनटक्के, जर्नादन भाकरे, योगेश खोडके, विनोद मांगळे, महेंद्र भगत, गजानन सोळंके, शंकर सोळंके आदी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून नुकसान झाले आहे.