मतदारांना घरकुलाचे आमिष दाखविण्यासाठी तोतया पथक सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:20 AM2021-01-03T04:20:08+5:302021-01-03T04:20:08+5:30
दोन महिला व एक पुरुष असे तिघांचे पथक शिरपूर येथे शनिवारी दुपारी दाखल झाले. गावात एका ठिकाणी पथकाच्या सदस्यांनी ...
दोन महिला व एक पुरुष असे तिघांचे पथक शिरपूर येथे शनिवारी दुपारी दाखल झाले. गावात एका ठिकाणी पथकाच्या सदस्यांनी गावातील काही मतदारांना जमा केले. रेशन कार्ड वाटप, जनगणना तसेच घरकुलांच्या सर्व्हेबाबत मतदारांना आमिष दाखविले. हा प्रकार शनिवारी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत सुरू होता. या प्रकाराची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरल्याने एकच खळबळ उडाली. शिरपूर येथील वाॅर्ड क्रमांक ३ चे उमेदवार रूम खा सुजात खा व त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी धाव घेत पथकाच्या सदस्यांची विचारपूस केली असता, त्यांनी पातूर पंचायत समितीकडून आल्याचे सांगितले. रेशन कार्ड वाटप, तसेच घरकूल सर्व्हे सुरू असल्याचे सांगितले. सध्या आचारसंहिता असल्याने कुठल्याही प्रकारचा सर्व्हे करता येत नसल्याचे रूम खा यांनी सांगितले. तेव्हा पथकातील तिन्ही सदस्यांनी दुचाकीवर बसून पळ काढला. हे तिघांचे पथक काेठून आले किंवा बोलावण्यात आले, या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतरच स्पष्ट होईल; पण सध्या हा चर्चेचा विषय बनला असून, या तसेच याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत चान्नी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू होती.
.......................
पथकाविरुद्ध कारवाई करण्याचे आव्हान
तोतया पथकाकडून मतदारांना आमिष दाखविल्याचा प्रकार उघडकीस आल्याने या पथकातील तिघांनीही पळ काढला, परंतु हे तिघेजण कुठचे रहिवासी व शिरपूर गावात कसे आले. या सर्व प्रकाराबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे पोलिसांसमोर आव्हानच आहे.
.................प्रतिक्रिया.......
तहसील कार्यालयातून कोणतेही पथक सर्व्हे करण्यासाठी शिरपूर किंवा इतर गावात गेलेला नाही, तसेच सर्व्हे करताना पथक आढळून आल्यास ते गैरकायदेशिर आहे. त्याबाबत ग्रामस्थांनी संपर्क करावा.
दीपक बाजड, तहसीलदार, पातूर
.........................प्रतिक्रिया.......
सध्या आचारसंहितेमुळे घरकुल किंवा इतर शासकीय सर्व्हे बंद आहे. तसेच ते पथक पंचायत समितीचे नाही. त्याबाबत चौकशी करण्यात करण्यात येईल.
अनंत लव्हाळे, प्रभारी गटविकास अधिकारी, पातूर