अकोट बाजार समितीत व्यापार बंद
By admin | Published: May 17, 2017 02:44 AM2017-05-17T02:44:35+5:302017-05-17T02:44:35+5:30
शिवसेनेचे हल्लाबोल आंदोलन : हमीभावाने माल खरेदीची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट: अकोट बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा उघड्यावर पडलेला शेतमाल शेडमध्ये ठेवण्यात यावा तसेच हमीदरापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करण्यात येऊ नये या मागणीकरिता शिवसेनेने बाजार समितीत १६ मे रोजी हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी बाजार समितीच्या सचिवांनी आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन दिले. दरम्यान, व्यापाऱ्यांनी हमी भावाने शेतमाल खरेदी करण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य बाजार हा पुढील सूचनेपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे.
अकोट बाजार समितीमध्ये शेतकरी पॅनल व शिवसेनेने माजी आमदार संजय गावंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह बाजार समिती गाठली. यावेळी बाजार समितीची पाहणी केली असता शेतकऱ्यांचा माल उघड्यावर तर व्यापाऱ्यांचा माल टिनशेडमध्ये असल्याचे आढळून आले. दोन महिन्यांपेक्षा जास्त तूर खरेदीला वेळ लागत असल्याचे निदर्शनास आले. तसेच हमीदरापेक्षा कमी दराने तूर व इतर शेतमाल व्यापारी खरेदी करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे सचिव राजकुमार माळवे यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी सचिव माळवे यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाची व्यवस्था शेडमध्ये करण्यात येईल. व्यापाऱ्यांनी साठवून ठेवलेला माल शेडमधून खाली करण्यात येईल. हमीदरापेक्षा कमी दराने खरेदी केलेला तूर व इतर शेतमाल खरेदीदारांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन माजी आमदार गावंडे यांना दिले.
त्यानंतर बाजार समिती सचिव व व्यापारी यांची बैठक झाली. या बैठकीत व्यापाऱ्यांनी हमीभावाच्या दराने तूर, भूईमूग व इतर शेतमाल खरेदी करण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती पुढील सूचनेपर्यंत धान्य बाजार बंद ठेवला असून, शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीकरिता आणू नये, अशा सूचना केल्या आहेत.
बाजार समितीमध्ये माजी आमदार संजय गावंडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे, तालुका प्रमुख श्याम गावंडे, भाऊराव अंबळकार, काशिराम साबळे, डॉ. गजानन महल्ले, प्रदीप वानखडे, ज्ञानदेव परनाटे, वत्सला खंडारे, प्रमोद खंडारे, मोहन गावंडे, डॉ. प्रमोद चोरे, साहेबराव भगत, निवृत्ती मेतकर, शरद नहाटे, दत्ताभाऊ चौधरी, राजू भालतिलक, ज्ञानेश्वर बोरोकार आदींसह शिवसेना, शेतकरी पॅनलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.