अन्नधान्यावर जीएसटीविरोधात व्यापार बंद; कोट्यवधींचे व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2022 11:50 AM2022-07-17T11:50:22+5:302022-07-17T11:52:35+5:30
Trade strike against GST on food grains : जिल्ह्यात एकाच दिवशी कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाल्याचा दावा या बंदला समर्थन दिलेल्या विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने केला आहे.
अकोला : नॉन ब्रँडेड अन्नधान्यावर सरसकट पाच टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) लावण्याचा निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी शनिवार, १६ जुलै रोजी पुकारण्यात आलेल्या एकदिवसीय बंदला अकोल्यात व्यापारी व उद्योजकांचा प्रतिसाद मिळाला. डाळमिल, किराणा बाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर धान्य विक्रेत्यांची प्रतिष्ठाने बंद राहिली. यामुळे जिल्ह्यात एकाच दिवशी कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाल्याचा दावा या बंदला समर्थन दिलेल्या विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने केला आहे.
जीएसटी काैन्सिलच्या सभेत हवाबंद पॅकिंग व लेबल असलेल्या सर्वप्रकारच्या खाद्यान्नावर जीएसटी आकारण्याची शिफारस केली आहे. या निर्णयामुळे देशभरातील डाळ उत्पादक व डाळ व्यापारी तसेच सर्वप्रकारच्या खाद्यान्नाचे उत्पादक व विक्रेत्यांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. अशाच पद्धतीने जर अव्यवहार्य निर्णय घेण्यात येईल, तर डाळ आणि खाद्यान्न उत्पादक, विक्रेता व्यावसायिकांना गंभीर आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावे लागेल. याचा परिणाम व्यापारी वर्गासोबतच शेतकरी आणि चिल्लर विक्रेता व ग्राहक यांच्यावर हाेणार असून, महागाईच्या झळा अधिक तीव्र होतील, त्यामुळे या निर्णयाविराेधात शनिवारी एकदिवसीय सांकेतिक बंद पाळण्यात आला. या संपात सहभागी होत जिल्ह्यातील १५० डाळमिल बंद ठेवण्यात आल्या. अकोल्यातील डाळमिलमधून देशभरात डाळ पाठविली जाते. डाळमिल बंद ठेवल्याने कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीतही बंद पाळण्यात आला. बाजारपेठेतील इतर व्यापारी प्रतिष्ठाने मात्र नेहमीप्रमाणे खुली ठेवण्यात आली होती.
जीएसटी रद्दच्या मागणीला विदर्भ चेंबरचे समर्थन
अन्नधान्य, कडधान्यावरील पाच टक्के कर रद्द करावा, या मागणीला विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने आपले समर्थन जाहीर केले आहे. इन्स्पेक्टरराज वाढविणारा व छोट्या व्यावसायिकांवर आर्थिक संक्रांत आणणारा हा पाच टक्के जीएसटी कर रद्द करण्याची मागणी विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष निकेश गुप्ता, वरिष्ठ उपाध्यक्ष आशिष चंदाराणा, कनिष्ठ उपाध्यक्ष राहुल गोयंका, सचिव नीरव वोरा, कोषाध्यक्ष किशोर बाछुका, सहसचिव निखिल अग्रवाल आदींनी केली आहे.
एकदिवसीय बंदला विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचा पाठिंबा आहे. आजच्या बंदमुळे राज्यभरात अंदाजे १० हजार कोटींचे व्यवहार ठप्प झाले. अकोल्यातही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असून, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प राहिले.
- निकेश गुप्ता, अध्यक्ष, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, अकोला