सावकारांच्या जाचाला कंटाळून आडत व्यापाऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 02:31 PM2019-09-11T14:31:18+5:302019-09-11T14:31:53+5:30
दहिगाव गावंडे येथीलच भास्कर रामचंद्र गावंडे याच्याकडून श्रीकृष्ण गावंडे यांनी २०१४ मध्ये दोन लाख रुपये व्याजाने घेतले होते.
अकोला -अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या विघ्नेश्वर अडत दुकानचे मालक श्रीकृष्ण बाकेराव गावंडे ( ५५) यांनी दहीगाव येथीलच रहिवासी असलेल्या दोन सावकारांच्या जाचाला कंटाळून मोठी उमरी येथे गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. त्यांच्यावर दहिगाव गावंडे येथे अंत्यसंस्कार पार पडले. अवैध सावकार बाबुराव गावंडे व त्याचा साथीदाराच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
मुळचे दहिगाव गावंडे येथील श्रीकृष्ण गावंडे यांची अकोल्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विघ्नेश्वर नावाने अडत दुकान आहे. ते अकोल्यात उमरीमध्ये प्रकाश सावरकर यांच्या घरी भाड्याने राहत होते. दहिगाव गावंडे येथीलच भास्कर रामचंद्र गावंडे याच्याकडून श्रीकृष्ण गावंडे यांनी २०१४ मध्ये दोन लाख रुपये व्याजाने घेतले होते. रकमेची परतफेड केल्यानंतरही भास्कर गावंडे हा व्याजाचे अव्वाचे सव्वा रुपये त्यांना पैसे मागतच होता. तर भास्कर गावंडेचे चुलतभाऊ बाबुराव रामभाऊ गावंडे व साहेबराव रामभाऊ गावंडे हे त्यांना पैसे दे नाही तर जीवाने मारू अशा धमक्या देत होते. सततच्या धमक्यांना त्रस्त होवून श्रीकृष्ण गावंडे यांनी गळफास घेवून आत्महत्या केली, अशी तक्रार श्रीकृष्ण गावंडे यांच्या पत्नी अरुणा यांनी सिव्हिल लाइन्स पोलिसांना दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी भास्कर रामचंद्र गावंडे, बाबुराव रामभाऊ गावंडे, साहेबराव रामभाऊ गावंडे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी भारतीय दंड विधानाच्या कलम ३०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.