व्यापार्यांकडून शेतकर्यांची लूट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:06 AM2017-11-01T01:06:11+5:302017-11-01T01:06:43+5:30
तेल्हारा : कृ षी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्यांचा शेतमाल मोजण्याकरिता बाजार समितीचा तोलकाटा आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये शेतकर्यांनी विक्रीस आणलेल्या शेतमालाचे बाजार समितीच्याच तोलकाट्यावर मोजमाप व्हावे, असे अपेक्षित असताना बाजार समितीमधील अडते व व्यापारी खासगी जिनिंगच्या तोलकाट्यावरच मोजमाप होईल, असा दबाव आणत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : कृ षी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्यांचा शेतमाल मोजण्याकरिता बाजार समितीचा तोलकाटा आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये शेतकर्यांनी विक्रीस आणलेल्या शेतमालाचे बाजार समितीच्याच तोलकाट्यावर मोजमाप व्हावे, असे अपेक्षित असताना बाजार समितीमधील अडते व व्यापारी खासगी जिनिंगच्या तोलकाट्यावरच मोजमाप होईल, असा दबाव आणत आहेत. तसे न केल्यास भावामध्ये फरक पडू शकते, अशा प्रकारची भीती शेतकर्यांमध्ये आहे. त्यामुळे शेतकर्यांनी अखेर या व्यापारी व अडत्यांच्या विरोधात बाजार समितीच्या सचिवांकडे तक्रार दाखल केली आहे.
शासनाने शेतकर्यांच्या शेतमालाचे हमीभाव जाहीर केले. त्यानुसार सध्या उडीद, मूग, सोयाबीन, तूर, ज्वारी यामध्ये सोयाबीनची आवक मोठय़ा प्रमाणात आहे; पण हमीभाव तर सोडाच; पण हमीभावाच्या जवळपासही व्यापारी मालाला भाव देत नसून, १४00 रुपयांपासून शेतकर्यांचे सोयाबीन खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. एकप्रकारे व्यापार्यांनी शासनाच्या हमीभावाचे दरपत्रक गुंडाळून ठेवल्याचे दिसून येत आहे. अगोदरच शेतकर्यांना एकरी ५0 किलोपासून सोयाबीनचे उत्पादन झाले आहे. त्यामध्ये हे भाव असल्याने शेतकरीवर्ग मेटाकुटीस आलेला आहे. इतर बाजार समित्यांच्या तुलनेमध्ये एवढे कमी भाव कुठेच दिसत नसल्याचा आरोप शेतकर्यांनी केला आहे. येथील व्यापार्यांनी तर यापुढे जाऊन कळस गाठला आहे. शेतकर्यांचा माल बाजार समितीमध्ये खरेदी करायचा व मोजमापाकरिता बाजार समितीच्या काट्यावर मोजमाप न करता हितसंबंध जुळलेल्या खासगी किंवा जिनिंग फॅक्टरीच्या तोलकाट्यावर मोजायचा. असे का, याबाबत शेतकर्यांनी प्रतिट्रॉली मोजमापापासून मिळणारे उत्पन्न हे बाजार समितीला न देता स्वत: किंवा हितसंबंध गुंतलेल्या तोलकाटा मालकाचा फायदा करावा तसेच विश्वासार्हता असलेल्या बाजार समितीचा काटा सोडून खासगी काट्यावरच मोजमाप होईल, असा दबाव आणण्यामागे शंकेची सुई निर्माण होत आहे. २६ ऑक्टोबरपासून धान्य बाजारातील अडते व व्यापारी शेतकर्यांवर शेतमालाच्या ट्रॉली बाहेरच्या काट्यावर मोजमाप करा, असा दबाव आणत असल्याची तक्रार शेतकरी सुरेश भारसाकळे, रवींद्र बोदडे, विलास सिरसाट, गणेश नेमाडे, अ. अनिस, डी. आर. शेगोकार, लीलाधर भटकर, गजानन उंबरकार, सुपडा पिंपळकर यासह इतरही शेतकर्यांनी बाजार समितीच्या सचिवांकडे केली आहे. त्यामुळे बाजार समितीच्या तोलकाट्यावरच मोजमाप व्हावे, अशी मागणीसुद्धा शेतकर्यांनी केली आहे.
व्यापारी शेतकर्यांवर दबाव आणून संबंधित व्यापार्यांच्या जिनातील तसेच खासगी इलेक्ट्रॉनिक काट्यावर मोजमाप करण्याबाबत तक्रार माझ्याकडे प्राप्त झाली आहे. याबाबत व्यापार्यांना सूचना दिली आहे. तरीही असले प्रकार होत असतील, तर नियमानुसार संबंधित व्यापार्यांवर कार्यवाही करू.
- माधवराव पाथ्रीकर,
सचिव, कृउबा समिती, तेल्हारा.