जनता भाजी बाजारातील व्यावसायिकांची शिवसेनेकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:21 AM2021-05-25T04:21:10+5:302021-05-25T04:21:10+5:30
अकोला : जनता भाजी बाजारातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनपा प्रशासनाच्या विरोधात बाजारातील भाजीपाला व फळे विक्री व्यावसायिकांनी सोमवारी ...
अकोला : जनता भाजी बाजारातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनपा प्रशासनाच्या विरोधात बाजारातील भाजीपाला व फळे विक्री व्यावसायिकांनी सोमवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांच्याकडे धाव घेतली. यावेळी व्यावसायिकांची बाजू ऐकून घेण्यासाठी सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे.
तत्कालीन नगरपरिषदेच्या कालावधीपासून भाजीपाला व फळे विक्री करण्यासाठी जनता भाजी बाजाराची जागा तत्कालीन जिल्हा प्रशासनाने लीज पट्ट्यावर दिली होती. दरम्यान, या जागेवरील आरक्षण लक्षात घेता, ही जागा विकसित करण्याच्या अनुषंगाने मनपा प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे जागेचे शुल्क जमा केले आहे. परंतु या जागेमध्ये मागील अनेक वर्षांपासून पिढ्यान् पिढ्या व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांसाठी मनपा प्रशासनाकडे कोणतीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याचा आक्षेप व्यावसायिकांनी घेतला आहे. व्यावसायिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत प्रशासनाच्या स्तरावर दुकाने हटविण्यासाठी वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे याप्रकरणी भाजीपाला व फळे विक्रेता व्यावसायिक संघटनांनी एकत्र येत सेनेचे जिल्हाप्रमुख तथा आ. नितीन देशमुख यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. चर्चेअंती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे बैठक आयोजित करून या बैठकीत व्यावसायिकांचे म्हणणे ऐकून घेण्याची विनंती सेनेकडून पत्राद्वारे जिल्हाधिकार्यांना करण्यात आली आहे.
संघर्ष कृती समितीचे होणार गठन
मनपा प्रशासनाच्या एकतर्फी कार्यवाहीला विरोध करण्यासाठी जनता भाजी बाजारातील भाजीपाला व फळे विक्रेत्यांच्या विविध संघटना एकत्र येणार आहेत. यावेळी संघर्ष कृती समितीचे गठन करून त्याद्वारे प्रशासनाच्या मनमानी निर्णयाला लढा दिला जाणार असल्याचे संकेत आहेत.
सेना-काँग्रेसचा हातात हात
भाजी बाजारातील व्यावसायिकांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशातून शहरात शिवसेना व काँग्रेस एकत्र आले आहेत. काँग्रेसच्यावतीने विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण व सेनेचे शहरप्रमुख तथा गटनेता राजेश मिश्रा यांनी व्यावसायिकांसाठी हातात हात घेतल्याचे चित्र आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष
जनता भाजी बाजारातील व्यावसायिकांची बाजू समजून घेण्यासाठी शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे. सेनेच्या पत्रावर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.