व्यापाऱ्यांची दर महिन्याला कोविड चाचणी होणे अनिवार्य - बच्चू कडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 11:04 AM2021-03-13T11:04:57+5:302021-03-13T11:05:05+5:30
Bachchu Kadu Instruction to Authority दर महिन्याला कोविड चाचणी होणे अनिवार्य असल्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला - जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाजीपाला विक्रेते, दूध व्यावसायिक, किराणा व्यावसायिक व किरकोळ व्यावसायिक यांच्या थेट संपर्कात येणाऱ्या व्यक्तिंची दर महिन्याला कोविड चाचणी होणे अनिवार्य असल्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
जिल्हाधिकारी भवनच्या नियोजन भवनात कोविडबाबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बाेलत हाेते. पालकमंत्री म्हणाले की, कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांच्या कोविड चाचण्यांवर भर देणे आवश्यक असून, पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कातील त्यांचे कुटुंबीय व इतर व्यक्तिंचा कॉन्ट्रॅक ट्रेस करून कोविड चाचण्या वाढवणे आवश्यक आहे. तसेच घरीच विलगीकरणात असलेल्या व्यक्तिंवर लक्ष ठेवून ते बाहेर फिरत असतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासारख्या उपाययोजना कराव्यात. तसेच ज्या व्यक्तिंच्या घरी विलगीकरणाची व्यवस्था नसेल अशांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे. लग्न समारंभांवर लक्ष ठेवून नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचेही निर्देश कडू यांनी दिले.
यावेळी विधानपरिषद सदस्य आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आमदार नितीन देशमुख, मनपा आयुक्त नीमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत उपस्थित होत्या.
आठवडा बाजार सुरू करण्याचे नियाेजन करा
आठवडा बाजार सद्यस्थितीत बंद आहेत. परंतु, भविष्यात आठवडा बाजार सुरू करण्याबाबत नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी आठवडा बाजारात येणाऱ्या दुकानदार व व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी करावी व आठवडा बाजार सुरू करण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना कडू यांनी दिल्या.
कायदा व सुव्यवस्थेचा आढावा
पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. जिल्ह्यात सुरू असलेली अवैध दारुविक्री नियंत्रणात आणण्यासाठी कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले. पोलीस स्थानकामध्ये वाचनालय व व्यायामशाळा असणे गरजेचे असून, यासाठी नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. शहरात कोणी भिकारी भीक मागताना दिसणार नाही, यासाठी मनपा व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करून भिकारीमुक्त शहर ही योजना राबवावी व भिकाऱ्यांना निवारा केंद्रात पोहोचवून त्यांच्यावर संस्कार करावेत, असेही त्यांनी सांगितले.