जनता बाजारातील व्यावसायिकांनी पुकारला बंद, बाजारात शुकशुकाट
By आशीष गावंडे | Published: October 7, 2022 07:06 PM2022-10-07T19:06:35+5:302022-10-07T19:07:03+5:30
अकोला येथे जनता बाजारातील व्यावसायिकांनी बंद पुकारला.
अकोला: जनता भाजी बाजारच्या जागेवर वाणिज्य संकुल उभारण्यासाठी नियमबाह्यरित्या जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया केली जात असल्याच्या निषेधार्थ बाजारातील व्यावसायिकांनी कडकडीत बंद पुकारत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चौकात ठिय्या दिला. यासंदर्भात न्याय देण्याची मागणी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवदेनाद्वारे करण्यात आली. शहराच्या मध्यभागातील जनता भाजी बाजारच्या जागेवर वाणिज्य संकुल तसेच जुने बस स्थानकाच्या जागेवर वाणिज्य संकुल व सीटी बससाठी वाहनतळाचे आरक्षण आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ जून २०१८ रोजी या दोन्ही जागेचा आगाऊ ताबा देण्याचा आदेश पारित केला होता. २०१८ मधील बाजार मुल्यानुसार या दोन्ही आरक्षित भूखंडांचे मुल्यांकन १३७ कोटी रुपयांपेक्षा अधिक होत असताना मनपा प्रशासनाने २६ कोटी रुपये जमा केले. यामुळे शासनाचे १११ कोटी रुपयांचे नुकसान करण्यात आले असून देशातील सर्वात मोठ्या एका कॉर्पोरेट कंपनीला ही जागा देण्यासाठी बाजारातील एक हजार कुटुंबियांची दुकाने उध्वस्त करण्याचे षडयंत्र आखण्यात आल्याचा आरोप करीत महात्मा फुले जनता बाजार संघर्ष समितीने गुरुवार पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरु केले होते.
उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट
जिल्हा नियोजन समितीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी अकोल्यात दाखल झाले होते. यावेळी जनता बाजारातील व्यावसायिकांनी त्यांची भेट घेउन निवेदन दिले. सन १९७२ मध्ये तत्कालीन नगर परिषदेने व्यावसायिकांना आठवडी बाजारासाठी जनता भाजी बाजाराची जागा दिली होती. ही जागा कायमस्वरुपी भाडेपट्टयाने मिळावी, अशी मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष सज्जाद हुसेन, उपाध्यक्ष पंकज मनियार, सल्लागार प्रदिप वखारिया, विजय तिवारी, निलेश चिराणीया, जितेंद्र अग्रवाल आदी उपस्थित होते.
बाजारात शुकशुकाट
जनता बाजारातील व्यावसायिकांनी एकत्र येत गठीत केलेल्या संघर्ष समितीच्यावतीने शुक्रवारी बाजार बंदची हाक देण्यात आली होती. संघर्ष समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजी बाजार, होलसेल फ्रुट बाजार, फुले विक्रेता, किराणा,कापड व्यावसायिकांनी कडकडीत बंद पुकारल्याचे दिसून आले.