भूताची भीती ठासून भरण्याचे काम परंपरेने केले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2017 03:24 AM2017-07-17T03:24:05+5:302017-07-17T03:24:05+5:30
दिलीप सोळंके : अंनिस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरास प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अज्ञानी प्रथा अन् पिढीजात चालत आलेल्या परंपरेने भूताची भीती मानवी मेंदूत ठासून भरली आहे. त्यामुळे जगात कुठेही अस्तीत्वात नसलेल्या भूताची भीती आहे. व्यक्तीच्या अव्यक्त मनातून ही भीती काढली तर व्यक्ती भूतमुक्त होऊ शकते, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य संघटक दिलीप सोळंके यांनी केले. गोरक्षण मार्गावरील साई कृपा मंगल कार्यालयात अंनिसच्या महानगर शाखेच्या वतीने आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात सोळंके रविवारी दुपारी बोलत होते. नैसर्गीक अडचण, उपाय, अनुकरण, दीर्घ अनुकरणातून प्रथा- परंपरा, आणि त्यातून अंधश्रध्देचा जन्म होतो. अंधश्रध्देतून भूत निर्माण होतात. जे सत्य नाही तरी ते सत्य आहे, हे डोळे बंद करून पीढीजात स्वीकारले जाते. व्यक्ती प्रचंड रागात असली की मेंदूमधील व्यक्त कप्पा बंद होतो आणि त्याच वेळी अव्यक्त कप्पा उघडा होतो. या कप्प्यात गेलेल्या एखाद्या सूचनेने व्यक्ती तंतोतंत पालन करते, रागाच्या भरात जवळच्या व्यक्तींच्या हत्त्या अशाच प्रकारे घडतात. म्हणून रागात निर्णय घेऊ नये असे मानसशास्त्रात सांगितले आहे.अज्ञातून निर्णाण झालेल्या भीतीपोटी आपल्या अव्यक्त मनात अंधश्रध्दा मुक्कामी आहेत, त्यांना हुसकावून लावणे म्हणजे अंधश्रध्दा निमूर्लन होय, असेही सोळंके याप्रसंगी बोलले.यावेळी डॉ. हर्षवर्धन मालोकर राज्य प्रवक्ते पुरुषोत्तम आवारे ,बुलडाणा जिल्हा संपर्कप्रमुख अशोक घाटे ,शरद वानखडे,महानगर संघटक चंद्रकांत झटाले ,सचिव मंगेश वानखडे उपस्थित होते.
उदघाटन सत्रात डॉ.हर्षवर्धन मालोकार यांनी देवापुढे नारळ का फोडले जाते याबद्दल बोलताना मानवी डोके आणि नारळ यातील विविध साम्य सुंदर उलगडून सांगितली,रूढी,परंपरा यांची प्रत्येकाने चिकित्सा केली तरच ज्ञान प्राप्त होईल असेही मालोकार यावेळी म्हणाले.अंनिसचा देवधमार्ला विरोध नाही मात्र त्या नावावर लोकांचे शोषण करणार्या बुवा,बाबा,मांत्रिक यांचा विरोध करते ,ही भूमिका म्हणजे पळवाट नव्हे तर जाणीवपूर्वक स्वीकारली आहे,कारण अंधश्रद्धेचे मूळ देव ,धर्म नाही आधी अंधश्रद्धा तयार झाल्या अशी माहिती आवारे यांनी देऊन स्वत:मध्ये बदल घडण्याची इच्छा असणार््या प्रत्येकाने या चळवळीत यावे असे आवाहन प्रास्ताविकात केले.
दुपारच्या सत्रात भूत आणि भूतांचे मानसशास्त्र, संत आणि चमत्कार, या विषयावर मार्गदर्शन करताना कोणत्याही संताने चमत्कार केले नाहीत. शेवटच्या सत्रात अशोक घाटे यांनी मंत्राने यज्ञ पेटविणे, नारळातून देवीचा खण काढणे, हवेतून अंगारा, वस्तू काढणे, जिभेवर कापूर जाळणे, हातातून गुलाल काढणे आदी चमत्कार करून दाखवून त्यामागील विज्ञान, हातचलाखी समजावून सांगितली. शिबिराला शहरातील १६० कार्यकर्ते उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी महानगर उपाध्यक्ष दिगंबर सांगळे, कोषाध्यक्ष विजय बुरुकले, प्रसिद्धिप्रमुख भारत इंगोले, जिल्हा सचिव संतोष टाले, तनुश्री भोसले, आशा उगवेकर, प्रेमदास राठोड, विठ्ठल तायडे, अश्विनी देशमुख, शेषराव गव्हाळे, संध्या देशमुख, विठ्ठल तायडे, धम्मदीप इंगळे, महेंद्र काळे, भवते, युवा अंनिसचे हरीश आवारे, विकास मस्के यांनी परिश्रम घेतले.