अकोला वाहतूक पोलिसांची १00 ऑटोचालकांवर कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 11:01 PM2017-11-23T23:01:26+5:302017-11-23T23:19:31+5:30
खासगी, ग्रामीण परमिट असलेले ऑटोरिक्षा शहरात अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करतात. या ऑटोरिक्षाचालकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखा पोलिसांनी गुरुवारी कारवाई सुरू केली. पोलिसांनी सायंकाळपर्यंत १00 ऑटोरिक्षा जप्त करून, चालकांकडून ६0 हजारांवर दंड वसूल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: खासगी, ग्रामीण परमिट असलेले ऑटोरिक्षा शहरात अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करतात. या ऑटोरिक्षाचालकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखा पोलिसांनी गुरुवारी कारवाई सुरू केली. पोलिसांनी सायंकाळपर्यंत १00 ऑटोरिक्षा जप्त करून, चालकांकडून ६0 हजारांवर दंड वसूल केला.
शहरात मोठय़ा संख्येने खासगी, ग्रामीण परमिट असलेले ऑटोरिक्षा अवैधरी त्या प्रवासी वाहतूक करतात. एवढेच नाही, तर शहरातील प्रत्येक रस्त्यावर ऑटोरिक्षाचालक वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने ऑटोरिक्षा उभ्या करतात. त्याचा वाहनचालक व नागरिकांना त्रास होतो. प्रसंगी अपघाताच्या घटनासुद्धा घडतात. शहरात परमिट असलेल्या ऑटोरिक्षांसोबतच जिल्हय़ातील ग्रामीण भाग आणि परजिल्हय़ातील ऑटोरिक्षांची भर पडली आहे. अनेक ऑटोरिक्षाचालकांकडे शहर परमिट नाहीत. अशाही परिस्थितीत हे ऑटोरिक्षा शहरात धावतात. ग्रामीण परमिट असलेल्या ऑटोरिक्षांनीही शहरात अतिक्रमण केले आहे. याविषयी अनेक ऑटोरिक्षाचालक संघटनांनी वाहतूक पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या; परंतु त्याची दखल घेण्यात येत नव्हती. पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखेची जबाबदारी स्वीकारल्यावर कारवाईस सुरुवात केली. गुरुवारी पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात वाहतूक पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी चौकांमध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणार्या, विनापरमिट वाहतूक करणार्या ऑटोरिक्षाचालकांवर मोटरवाहन कायद्यानुसार कारवाई करून त्यांचे ऑटोरिक्षा जप्त करून, शहर वाहतूक नियंत्रण शाखा कार्यालयात आणले. याठिकाणी वाहतूक पोलिसांनी ऑटोरिक्षाचालकांकडून ६0 हजारावर दंड वसूल केला. पोलिसांनी आणखी काही दिवस ही मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.