पुलाचे बांधकाम होण्यापूर्वी अकोटपर्यंत रेल्वे सुरू होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 01:55 PM2020-03-07T13:55:39+5:302020-03-07T13:55:46+5:30
अकोट येथील पुलाजवळील अकोला वळण मार्गावरील रेल्वे लोहमार्गावर प्रतिबंधक प्रवेशद्वार बसविण्यात आले आहे.
- विजय शिंदे
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट: अकोला-खंडवा रेल्वे लोहमार्गाच्या रुंदीकरणाचे काम अकोट शहरापर्यंत पूर्ण झाले असून शहरात रेल्वे मार्गावर प्रतिबंधक द्वार बसविण्यात आल्याने लवकरच अकोटपर्यंत रेल्वे सुरू होण्याची शक्यता आहे. अकोट शहराच्या पुढे रेल्वे मार्गाचे काम रखडले आहे. त्यामुळे खंडवापर्यंत रेल्वे सुरू होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागण्याचे संकेत आहेत.
चार राज्यांना सोयीचा म्हणून अकोला-खंडवा रेल्वे मार्ग असल्याने या लोहमार्गाचे रुंदीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे अकोटपर्यंत रूळ टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. या रेल्वे मार्गावरून रेल्वेची चाचपणी घेण्यात आली. शिवाय अकोट रेल्वे स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तिकीट कार्यालयासह मनुष्यबळ सज्ज करण्यात आले. केवळ अकोट शहरातील अकोला पुलाचे काम अर्धवट आहे. अकोट येथील पुलाजवळील अकोला वळण मार्गावरील रेल्वे लोहमार्गावर प्रतिबंधक प्रवेशद्वार बसविण्यात आले आहे. सिग्नल उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अकोटपर्यंत रेल्वे सुरू होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या अकोट-अकोला रस्त्याचे काम सुरूच आहे. अशा स्थितीत रस्त्याने प्रवास करणे अवघड झाले आहे. त्यामुळे रेल्वे मार्ग सुरू होण्याचे संकेत मिळत असल्याने जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या मार्गवर अकोलावरून पुढे अकोटपर्यंत, नागपूर, पूर्णा आदी रेल्वेगाड्या धावण्याची शक्यता असली तरी दक्षिण-मध्य रेल्वे प्रशासन काय निर्णय घेते, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. रेल्वेचे आर्थिक उत्पन्न व प्रवासी सोयी पाहता लोकप्रतिनिधींनी अकोटपर्यंत लवकर रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.