तीन राज्यांतील २७० प्रशिक्षणार्थी तरुण अडकले ‘लॉकडाऊन’मध्ये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 11:44 AM2020-03-29T11:44:43+5:302020-03-29T11:45:03+5:30
अकोला शहरातील खडकी भागात शनिवारी त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
अकोला: एका कंपनीच्या मार्केटिंग प्रशिक्षणासाठी तीन महिन्यांपूर्वी तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळ या तीन राज्यांतून अकोल्यात आलेले २७० प्रशिक्षणार्थी तरुण ‘लॉकडाऊन’मध्ये अडकले असून, जिल्हा प्रशासनामार्फत अकोला शहरातील खडकी भागात शनिवारी त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
एका कंपनीच्या मार्केटिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी तेलंगणा, आंध्र प्रदेश व केरळ या तीन राज्यांतील २७० तरुण तीन महिन्यांपूर्वी अकोला शहरात आले होते. अकोल्यातील खडकी भागात एका डुप्लेक्समध्ये राहून ते मार्केटिंग प्रशिक्षण घेण्याचे काम करीत आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनामार्फत देशभरात ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले असून, राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. तसेच कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आल्यानंतर तीन राज्यांतील संबंधित प्रशिक्षणार्थी तरुणांनी आपापल्या गावी परत जाण्यासाठी २७ मार्च रोजी जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली; परंतु राज्यभरात लागू करण्यात आलेली संचारबंदी आणि जिल्ह्यातील सीमा बंद करण्यात आल्याच्या स्थितीत प्रशासनाकडून संबंधित तरुणांची गावी परत जाण्याची मागणी अमान्य करण्यात आली. ‘लॉकडाऊन’मध्ये अडकलेल्या तीन राज्यांतील या प्रशिक्षणार्थी तरुणांची जिल्हा प्रशासनामार्फत २८ मार्च रोजी अकोल्यातील खडकी भागात निवासाची व्यवस्था करण्यात आली. तसेच स्वयंसेवी संस्थांकडून त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
वैद्यकीय पथकाने केली आरोग्य तपासणी!
अकोला महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वैद्यकीय पथकामार्फत २८ मार्च रोजी अकोल्यात अडकलेल्या तीन राज्यांतील संबंधित २७० तरुणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
१६ फ्लॅटमध्ये केली निवास व्यवस्था!
‘लॉकडाऊन’मध्ये अकोल्यात अडकलेल्या तीन राज्यांतील २७० तरुण प्रशिक्षणार्थी तरुणांची जिल्हा प्रशासनामार्फत अकोल्यातील खडकी भागात १६ फ्लॅटमध्ये निवास व्यवस्था करण्यात आली. प्रत्येक फ्लॅटमध्ये तीन याप्रमाणे १६ फ्लॅटमध्ये २७० जणांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे.
एका कंपनीच्या मार्केटिंग प्रशिक्षणासाठी तीन महिन्यांपूर्वी अकोल्यात आलेल्या तीन राज्यांतील २७० तरुणांनी गावी परत जाण्याची मागणी केली; मात्र कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’मध्ये संबंधित तरुणांना परत जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. अकोल्यातील खडकी भागात त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
-विजय लोखंडे,
तहसीलदार, अकोला.