आदिवासी विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 02:57 PM2019-05-15T14:57:29+5:302019-05-15T14:57:41+5:30
राज्यातील ५५६ अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व पौगंडावस्थेतील मुले-मुलींना या उपक्रमांतर्गत प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यासाठी २ कोटी ३१ लक्ष रुपये खर्चास १० मे रोजी मान्यता देण्यात आली आहे.
अकोला: दारिद्र्य, अज्ञान व अंधश्रद्धेचा समावेश असलेल्या आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासोबतच त्यांना शिस्त व वैयक्तिक आरोग्यासंदर्भात आत्मनिर्भर करण्यासाठी युनिसेफच्या मदतीने राजमाता बाल आरोग्य व पोषण मिशन अंतर्गत जीवन कौशल्य प्रशिक्षण देण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. राज्यातील ५५६ अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व पौगंडावस्थेतील मुले-मुलींना या उपक्रमांतर्गत प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यासाठी २ कोटी ३१ लक्ष रुपये खर्चास १० मे रोजी मान्यता देण्यात आली आहे.
आदिवासी समाजाला विकासाच्या व शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून विविध स्वरूपाचे उपक्रम राबवल्या जातात. आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात असंख्य प्रश्न असतात. वाढत्या वयासोबत त्यांच्या मनात निर्माण होणारे प्रश्न, त्यांना दैनंदिन भेडसावणाºया समस्या ज्यामध्ये आरोग्य, स्वत:ची नीगा राखणे, स्वच्छता, सुरक्षितता, वयात येणे व शैक्षणिक जीवन कसे जगावे याबद्दल अनेक संभ्रम राहतात. अशा मुला-मुलींच्या मनातील प्रश्नांना वाट मोकळी करून देण्यासाठी शासनाने युनिसेफच्या मदतीने राजमाता बाल आरोग्य व पोषण मिशन अंतर्गत राज्यातील अनुदानित ५५६ आश्रमशाळेतील प्रत्येकी चार शिक्षक व इयत्ता ७ वी ते १२ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना जीवन कौशल्य प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मास्टर ट्रेनर्स देतील प्रशिक्षण
युनिसेफच्या साहाय्याने आश्रमशाळेतील काही शिक्षकांची निवड करून त्यांना राज्यस्तरावर मास्टर ट्रेनर्सना प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर आश्रमशाळेतील प्रत्येकी दोन महिला व दोन पुरुष शिक्षकांना सदर मास्टर ट्रेनर्स प्रशिक्षण देतील. प्रशिक्षित शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाचे धडे दिले जातील.
अमरावती विभागात १२५ शाळा
अमरावती विभागात अनुदानित १२५ आश्रमशाळा असून, त्यामधील ५०० शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये औरंगाबाद, अकोला, अमरावती, नांदेड, बीड, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा जिल्ह्याचा समावेश आहे.