मध्य रेल्वे मार्गावर खंडव्यासाठी गाड्या सुरू करणार - डीआरएम

By admin | Published: January 19, 2017 02:49 AM2017-01-19T02:49:01+5:302017-01-19T02:49:01+5:30

लवकरच सकारात्मक पावले उचलण्याचे आश्‍वासन.

Trains will be started on the Central Railway route - DRM | मध्य रेल्वे मार्गावर खंडव्यासाठी गाड्या सुरू करणार - डीआरएम

मध्य रेल्वे मार्गावर खंडव्यासाठी गाड्या सुरू करणार - डीआरएम

Next

अकोला, दि. १८- मीटरगेज रेल्वे मार्ग बंद झाल्यानंतर अकोल्याहून खंडव्याला जाणार्‍या प्रवाशांना प्रचंड अडचणीचा प्रवास करावा लागत आहे. मध्य रेल्वे मार्गावर अकोला ते खंडवादरम्यान अतिरिक्त गाड्या सुरू करा, या खासदार संजय धोत्रे यांच्या प्रस्तावावर नांदेड डीआरएम डॉ. अखिलेशकुमार सिन्हा यांनी लवकरच याबाबत सकारात्मक पावले उचलणार असल्याचे आश्‍वासन दिले.
दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव हे येत्या २७ जानेवारी रोजी अकोला दौर्‍यावर येत आहेत. यानिमित्त नांदेड विभागीय व्यवस्थापक डॉ. सिन्हा यांनी बुधवारी अकोला रेल्वेस्थानकाला भेट दिली. यावेळी खासदार संजय धोत्रे यांनी त्यांची भेट घेऊन अकोला व शिवणी शिवर रेल्वेस्थानकावर भेडसावणार्‍या विविध समस्यांवर चर्चा केली. रेल्वे बोर्डाच्या आदेशानंतर १ जानेवारीपासून अकोला-खंडवा मीटरगेज रेल्वे मार्ग बंद करण्यात आला आहे. मार्ग रुंदीकरणासाठी झालेला हा निर्णय निश्‍चित चांगला असला, तरी महू पॅसेंजर बंद झाल्यामुळे अकोल्याहून खंडव्याला जाणार्‍या प्रवाशांना प्रचंड अडचणीचा प्रवास करावा लागत आहे. खंडव्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर अतिरिक्त गाड्या सुरू करा, अशी मागणी यावेळी खासदार धोत्रे यांनी डॉ. सिन्हा यांच्याकडे केली. याबाबत लवकरच भुसावळ विभागीय व्यवस्थापकांशी चर्चा करून, सकारात्मक पावले उचलणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच नरखेड मार्गेसुद्धा अतिरिक्त गाडी सुरू करण्याबाबत त्यांनी सकारात्मकता दर्शविली. शिवणी, शिवर रेल्वेस्थानकावर उद्योजकांना भेडसावणार्‍या प्रश्नांवरसुद्धा यावेळी खासदारांनी अधिकार्‍यांचे लक्ष वेधले. त्यासुद्धा प्राधान्याने सोडविणार असल्याचे डॉ. सिन्हा यांनी यावेळी आश्‍वासन दिले.
अकोला-अकोटदरम्यान काम सुरू
मार्ग रुंदीकरणासाठी अकोला-खंडवा मीटरगेज रेल्वे मार्ग बंद करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील अकोला-अकोटदरम्यानच्या कामास प्रारंभ झाला असल्याची घोषणा यावेळी डॉ. सिन्हा यांनी केली. सिकंदराबाद येथील कन्स्ट्रक्श्न कंपनीने अकोला-अकोटदरम्यान असलेल्या तीन मोठय़ा रेल्वे पुलांच्या निर्मितीस प्रारंभ केला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मार्ग रुंदीकरणाचा पहिला टप्पा किती वर्षांत पूर्ण होणार, हे २७ जानेवारी रोजी अकोला भेटीदरम्यान महाव्यवस्थापक स्पष्ट करणार असल्याचे डॉ. सिन्हा यांनी यावेळी सांगितले.
रेल्वे फलाटांची पुनर्बांधणी करणार
गेज परिवर्तनासह फलाट क्रमांक ४, ५, ६ आणि ७ ची पुनर्बांधणी करण्यात येणार असून, यामध्ये फलाटांची उंची आणि रुंदी वाढविण्यात येणार असून, त्यावर शेड उभारण्यात येणार असल्याचे डॉ. सिन्हा यांनी सांगितले.

Web Title: Trains will be started on the Central Railway route - DRM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.