परिचारिका संवर्ग व कनिष्ठ लिपिकांच्या बदल्या कायदेशीर होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:13 AM2021-07-24T04:13:37+5:302021-07-24T04:13:37+5:30
बदल्यांसंदर्भात राज्य सरकारी कर्मचारी संघटना व परिचारिका संघटनेतर्फे प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. यावेळी बदल्या या बदली अधिनियम २००५ ...
बदल्यांसंदर्भात राज्य सरकारी कर्मचारी संघटना व परिचारिका संघटनेतर्फे प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. यावेळी बदल्या या बदली अधिनियम २००५ व शासनाचे ९ एप्रिल २०१८ च्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे करण्याचा आग्रह संघटनेकडून धरण्यात आला. तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी पद रिक्त असल्यास त्या ठिकाणी सुद्धा परिचारिकांना बदली देण्यास प्रशासनाला मागणी केली, अन्यथा परिचारिका समुपदेशनावर बहिष्कार टाकतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला होता. यावेळी गायकवाड यांनी उपसंचालक कार्यालय जिल्हा स्त्री रुग्णालय गाठून कर्मचारी यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. शेवटी उपसंचालक यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी उपसंचालकांनी नियमाप्रमाणे बदल्या करण्याचे मान्य केले. नंतर बदलीपात्र कर्मचाऱ्यांची द्वारसभा घेऊन समुपदेशनाची बदलीपात्र माहिती देण्यात आली. सभेला परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा वर्षाताई पागोटे, आयटक कामगार संघटनेचे नेते नयन गायकवाड, डी. एस. पवार यांनी संबोधन केले. या सभेस आशाताई दाभाडे, एस. सी. माणिकपुरे, ममता चव्हाण, मनीषा वळवी, ऋतु बैस व बदलीपात्र कर्मचारी उपस्थित होते.